मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची सिनेटमध्ये चिंता
मुंबई, ता. २७ : मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आणि नवी मुंबई परिसरात येत्या काळात युरोपीय देशातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येत असल्याचे पडसाद रविवारी (ता. २७) झालेल्या विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उमटले.
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमुळे मुंबई विद्यापीठाच्या अस्तित्वाचाच प्रश्न यानिमित्ताने निर्माण होऊ शकतो, असे सांगत या विषयावर सिनेट सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या येत असलेल्या विद्यापीठांना इथला भूगोल माहीत नाही. त्यामुळे त्यांना इथे वाटेल तितके सोपे नसल्याने त्यांच्यासाठी घाबरण्याचे कारण नसल्याचे उत्तर दिले. तसेच या विद्यापीठांनी आपल्यासोबत काम करता येईल, अशी इच्छाही दाखवली असल्याचे कुलकर्णी यांनी आपल्या उत्तरात सांगितले. दरम्यान, डॉ. कुमरे यांनी सांगितले की, ‘गेल्या तीन-चार दिवसांतील घडामोडींनुसार अजून पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे मुंबई परिक्षेत्रात येणार असल्याचे कळते, यामुळे देशातील अग्रगण्य असलेल्या आपल्या मुंबई विद्यापीठाच्या अस्तित्वाचाच प्रश्न यानिमित्ताने निर्माण होऊ शकतो, असे असले तरी मुंबई विद्यापीठाने याबाबतीत कोणती तयारी केली व उपायोजना केल्या याबाबतीत आम्ही अनभिज्ञ आहोत.’ मुंबई विद्यापीठाने या अत्यंत तातडीच्या मुद्द्यावर याबाबतीत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी आपल्या स्थगनच्या माध्यमातून कुमरे यांनी केली होती.