दोन किमीवर शेकडो खड्डे !
बदलापूर-कर्जत महामार्ग १२ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाताना गोरेगावपासून पुढे वांगणीपर्यंतच्या रस्त्यावर एक दोन नव्हे, तर शेकडो खड्डे पडलेले आहेत. जणू काही या महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहणच लागले आहे. त्यामुळे या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे. परिसरातील रिक्षाचालकांना यामुळे पाठीचे दुखणे वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सिमेंट काँक्रीटीकरण कामाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आणि टप्प्याटप्प्याने हे काम सुरू झाले. सध्या बदलापूरपासून अगदी गोरेगावपर्यंतचा रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा झाला आहे, तर त्या पुढील वांगणीपर्यंतचा रस्ता अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. पावसात या ठिकाणी ठिकठिकाणी छोटे-मोठे असे शेकडो खड्डे पडल्याने नक्की रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता, असा प्रश्न इथली परिस्थिती पाहिल्यावर येतो.
वांगणी परिसरातून कर्जत-पुण्याला जाणारा महामार्ग हा खड्डेमय झाला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात या रस्त्यांवर पडलेले खड्डे इतके मोठे आहेत की पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालकांचे इथे अपघात होतात. रात्रीच्या वेळेत या ठिकाणी पथदिवे नसल्याने अपघातांची संख्याही वाढत आहे. त्या खड्ड्यांचा सगळ्यात जास्त त्रास हा इथल्या रिक्षाचालकांना होतो. रोज प्रवासी भाडे घेऊन सततच्या फेऱ्या आणि खड्ड्यातून रिक्षा आपटत असल्याने रिक्षाचे अनेकदा दुरुस्ती आणि देखभालीचे काम निघते, परिणामी मिळकतीच्या कमाईपेक्षा जास्त खर्च सोसावा लागत आहे. त्यात भर म्हणून पाठीचे दुखणे, मणक्याचा त्रास वाढत आहे. आजारपणावर तितकाच खर्च होत आहे, अशी प्रतिक्रिया इथल्या रिक्षाचालकांनी दिली आहे.
पर्यटकांसाठी वाट धोक्याची
बदलापूर ते अगदी कर्जतपर्यंतच्या परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहनांची वर्दळ सतत पाहायला मिळते. शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी तर या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवर तयार झालेले खड्डे आणि खराब झालेला रस्ता पर्यटकांना दळणवळणासाठी धोक्याचा झाला आहे.
काम अर्धवट स्थितीत
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महामार्ग हे सिमेंट काँक्रीटचे झाले असून, बदलापूर-कर्जत महामार्गावरसुद्धा अनेक टप्प्यांमध्ये हे काम झालेले आहे; मात्र गोरेगावपासून वांगणीपर्यंतचा जर पट्टा पाहिला, तर या ठिकाणी जवळपास एक ते दीड किलोमीटरचा रस्ता हा खड्ड्यात हरवलेला आहे. गेल्या १२ वर्षांपासून या रस्त्यावर दुरुस्तीचे काम झाले नसल्याने या रस्त्याची ही स्थिती असल्याची माहिती समोर येत आहे.
रोज या रस्त्यावरून प्रवासी भाडे घेऊन ये-जा करावी लागते. रस्त्यावरील या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांबरोबर आम्हालाही सहन करावा लागतो. रिक्षा चालवताना हातावर पोट असणाऱ्या आम्हाला, या खड्ड्यांमुळे पाठीचे दुखणे आणि रिक्षाच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च हा अतिरिक्त भार आमच्यावर पडत आहे. निदान प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून आम्हाला या त्रासातून बाहेर काढावे.
कमल दुबे, रिक्षाचालक
रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाच्या संदर्भातील प्रस्ताव आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठवला आहे; मात्र अद्याप या कामासाठी मंजुरी आलेली नाही. त्यामुळे पावसाळापूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येते. पावसाळ्यात रस्त्यांवर पडत असलेले खड्डे खडी टाकून बुजवले जातात. मात्र पाऊस जास्त पडला की या खडी वाहून जाते आणि रस्ता पुन्हा पूर्ववत होतो. त्यामुळे पावसाळा कमी झाल्यानंतर लगेचच या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेणार आहोत, मात्र तत्पूर्वी खडी टाकण्याचे काम सुरू आहे.
प्रशांतकुमार मानकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.