नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ४ : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग, रस्त्यांवरील रिक्षाचालकांची मनमानी आणि वाहतूक सिग्नलचे उल्लंघन यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या डोळ्यासमोर ठेऊन आता उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी नागरिकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि तत्काळ प्रतिसाद देणारी ‘वाहतूक मदतवाहिनी सेवा’ सुरू केली आहे. या सेवाअंतर्गत ८६५५६५४१८६ हा क्रमांक कार्यान्वित केला आहे.
नागरिक मदतवाहिनी क्रमांकावर थेट कॉल किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून समस्या, तक्रारी आणि सूचना देऊ शकतात. कोणत्याही वाहतूक अडचणीची नोंद नागरिकांना आता घरबसल्या करता येणार आहे. या सेवेमुळे रस्त्यांवरील अडथळे, बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमण, रिक्षाचालकांची मुजोरी अशा गोष्टी पोलिसांच्या लक्षात सहज येतील आणि त्यावर तातडीने कारवाई करता येईल.
वाहतूक पोलिस विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाट यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांच्या तक्रारींची अधिकृत नोंद आणि त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. ही सेवा केवळ तक्रारीपुरती मर्यादित नाही, तर नागरिकांना सूचना, वाहतूक सुरक्षेवरील मुद्दे, अपघात किंवा सिग्नलचे बिघाड असे कोणतेही मुद्दे कळवता येतील. या माध्यमातून प्रशासन व नागरिकांमध्ये थेट संवाद साधला जाणार आहे.
कारवाई सुलभ होणार
मदतवाहिनीवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी व सूचनांची लेखी नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून आवश्यक ती तत्काळ किंवा नियोजित कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तक्रार करताना शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ पाठवावा, जेणेकरून अधिक स्पष्टता मिळेल आणि कारवाई सुलभ होईल. यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या अडचणी वेळेत कळतील आणि शहरात शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती तयार होण्यास मदत होणार आहे.
दिशाभूल तक्रारींवर कारवाई
मदतवाहिनीचा प्रामाणिक व सकारात्मक वापर करावा. खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या तक्रारी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र योग्य व आवश्यक तक्रारींसाठी विभाग तातडीने कृती करेल, असा विश्वास वाहतूक पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.
प्रवास अधिक सुरक्षित
अशा प्रकारच्या तांत्रिक आणि संवादात्मक उपाययोजनांमुळे शहरातील वाहतूक नियंत्रणात येईल, अपघातांची संख्या कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित होईल, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
===============================
मदतवाहिनीच्या माध्यमातून नागरिकांना थेट आमच्याशी जोडले आहे. प्रत्येक तक्रार ही महत्त्वाची असून, त्यावर शक्य तितक्या लवकर कारवाई केली जाईल. बेकायदा पार्किंग, कोंडी, वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. दिलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही तातडीने प्रतिसाद देऊ. सुरक्षित, सुटसुटीत वाहतूक हीच प्राथमिकता आहे.
- राजेश शिरसाट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक
==================
उल्हासनगर : वाहतूक पोलिसांनी नागरिकांसाठी ‘वाहतूक मदतवाहिनी सेवा’ सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.