वसई ता. ३ (बातमीदार) : विविध जाती-प्रजातींचे पक्षी एकाच ठिकाणी पाहण्यासाठी पक्षी उद्यानाची सफर करावी लागते, मात्र यापुढे पर्यटकांसह वसई-विरारवासीयांना पक्ष्यांचा किलबिलाट शहरातच कानी पडणार आहे. त्यासाठी जीवदानी मंदिर परिसरात लवकरच पक्षी उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराचे साधनदेखील स्थानिकांना मिळणार आहे.
वसई-विरार शहरात हंगामी कालावधीत सातासमुद्रापार पक्षी हे दाखल होतात. मिठागरे, मोकळी जागा, पाणथळ जागा मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात अनेक पक्ष्यांचे दर्शन होते. हे पक्षी वैभव पाहण्यासाठी नागरिकांची आतुरता असते. फ्लेमिंगोंपासून ते रंगीत करकोचा, श्वेत करकोचा, मुग्धबलाक, खंड्या, बगळे, मैना, निळकंठ, जांभळी पाणकोंबडी, शराटी, पाणकावळे, घार, गरुड, चिमणी, शाळुंखी, राघू, तुतारी, खंड्या, टिटवी, बुलबुल, कुहुवा, पहाडी अंगारक, महाभृंगराज, सुतार, मोर यांसह स्थलांतरित ससाणा, गप्पीदास, स्टार्क, ऑस्ट्रेलियन स्वॅम्फेन, युरेशियन स्पूनबिल यासह अनेक पक्षी हे वसईत भ्रमंती करतात. वसई-विरार महापालिकेने २०२४ मध्ये केलेल्या गणनेत एकूण तीन हजार पक्षी आढळून आले होते, ज्यात देशी-परदेशी एकूण ४५ प्रजातींचा समावेश होता. पक्षी उद्यान उभे राहिले, तर विविध पक्षी पाहण्यासाठी मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येणार आहे.
वसई-विरार शहरातील नागरिकांना, तसेच विरार पूर्वेकडील जीवदानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पक्षी पाहण्याचा आनंद मिळावा, यासाठी सिंगापूरच्या जुरान पार्कच्या धर्तीवर पक्षी उद्यान (बर्ड पार्क) उभारले जाणार आहे. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जीवदानी मंदिर ट्रस्टची सहमती घेण्यात येणार असून, लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करून हा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार आहे.
मनसोक्त भ्रमंतीचा आनंद
जीवदानी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त पंकज भास्कर ठाकूर यांच्याशी पक्षी उद्यानासंदर्भात चर्चादेखील केली आहे. संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर पक्षी अभ्यासकांना माहिती घेणे, तसेच पक्ष्यांचा किलबिलाट, पर्यटक व नागरिकांना मनसोक्त भ्रमंतीचा आनंद घेता येणार आहे. हे पक्षी उद्यान वसईच्या सुंदरतेत व जैवविविधता टिकवण्यासाठी भर टाकणार आहे.
माहितीसाठी मार्गदर्शक नेमणार
या उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना पक्ष्यांची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी पक्षी प्रशिक्षक, तसेच पक्ष्यांची माहिती देणारे मार्गदर्शक (गाईड) असणार आहेत, जेणेकरून त्यांचे भक्ष्यासह कोणत्या परिसरातील आहेत, यासह विविध माहितीही नागरिकांना मिळू शकते.
वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रातील जीवदानी मंदिर परिसरात पक्षी उद्यान उभारण्याची संकल्पना आहे, जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध पक्षी पाहण्याची संधी वर्षभर मिळेल, यासाठी जीवदानी मंदिर ट्रस्टसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई-विरार महापालिका
उद्यानाचे लाभ
- पर्यटनाला चालना.
- वर्षभर पक्षी पाहण्याची संधी.
- हिरवाईचा अनुभव.
- भक्ष्यासाठी व्यवस्था.
- वॉकिंग ट्रॅक.
- रोजगारनिर्मिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.