मेगाब्लॉक : सुरक्षित प्रवासासाठी नियोजित विश्रांती
दर रविवारी राबतात हजारो रेल्वे कामगार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : रविवारचा ‘मेगाब्लॉक’ म्हणजे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक अडथळा वाटतो. मात्र प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाठी घेतलेली ही नियोजित विश्रांती असते. दर रविवारी हजारो रेल्वे कामगार यादरम्यान रेल्वे रुळांवर राबत असतात.
रेल्वेच्या रुळांपासून सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, ब्रिज दुरुस्ती ते प्लॅटफॉर्म आणि पायऱ्यांपर्यंतच्या कामांसाठी ही नियोजित विश्रांती आवश्यक असते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘मेगा ब्लॉक’ हा रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा एक अपरिहार्य भाग असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेमार्गावर दररोज १,८१० लोकल आणि २१० पेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. या विभागात रेल्वे ट्रॅकपासून ते सिग्नल आणि ओव्हरहेड वायरपर्यंत प्रत्येक यंत्रणा सतत वापरात असते. दिवसाच्या कोणत्याही क्षणी ट्रॅक पूर्णपणे रिकामा नसतो. त्यामुळे काही विशिष्ट देखभाल व दुरुस्तीची कामे प्रवासी वाहतूक चालू असताना करणे अशक्य असते. यासाठीच ‘मेगाब्लॉक’ म्हणजे संपूर्ण ट्रॅक काही तासांसाठी बंद करून त्यादरम्यान अत्यावश्यक आणि नियोजित देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची व्यवस्था असते.
रेल्वेच्या विविध यंत्रणा, अधिकारी, अभियंते आणि कामगार काही तास अतिशय समन्वयाने काम करतात. या ब्लॉकचा उद्देश गाड्या थांबवणे नसून, रेल्वेचा श्वास सुरू ठेवणे, हा असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.
या कामांचा समावेश
रविवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेचे ५०० हून अधिक कामगार व अधिकारी दुरुस्तीच्या कामासाठी तैनात होतात. यामध्ये अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार, विद्युत विभाग, नियंत्रण कक्षातील अधिकारी यांचा समावेश असतो. ट्रॅकवरील रुळ बदलणे, खडीची साफसफाई, डी-स्ट्रेसिंग, अल्ट्रासोनिक चाचण्या, पॉईंट मशिन्स बदलणे, सिग्नल खांबांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची उंची समायोजन यांसारख्या अनेक कामांसाठी प्रगत यंत्रसामग्री आणि कुशल मनुष्यबळ तैनात केले जाते.
विविध विभागांची एकत्रित धडपड
-अभियांत्रिकी विभाग हा खडी, स्लीपर्स, वेल्ड, फिश प्लेट्स आणि पादचारी पूल, रेल्वे पूलांवरील सर्व पायाभूत कामे करत असतो.
-सिग्नल व दूरसंचार विभाग पॉईंट मशीन, ट्रॅक सर्किट, सिग्नल खांब यांची दुरुस्ती करत असतो.
-विद्युत विभाग ओव्हरहेड वायर, स्विचगिअर, मास्ट्स आणि अर्थिंग यंत्रणांची देखभाल करतो. हे सगळे काम समांतरपणे आणि अत्यंत काटेकोर समन्वयात केले जाते.
पावसाळी कामे
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची साफसफाई, पंप बसवणे, बोल्डर नेटिंग, दरडी रोखण्यासाठी संरचना उभारणे यासारख्या कामांनाही ब्लॉकदरम्यान प्राधान्य दिले जाते. प्रवाशांना प्रवासाला विलंब होऊ शकतो, पण रेल्वेसाठी हा काळ कामाची श्वास घेण्याची संधी असतो. मेगा ब्लॉकमुळे ट्रॅकवरून गाड्या बंद असल्याने बिघाडांच्या भीतीशिवाय अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करता येतात. अशा देखभालीमुळेच रेल्वे सेवा अधिक सुरक्षित, अचूक आणि वेळेवर राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.