जंजिरे वसई किल्ल्यासाठी श्रमदान
विरार (बातमीदार) : किल्ले वसई मोहीम परिवाराच्या वतीने जंजिरे वसई किल्ल्याच्या मुख्य बंदर दरवाज्याच्या संवर्धनासाठी श्रमदान करण्यात आले. या उपक्रमात तीन दुर्गमित्रांनी तटबंदीवर वाढलेली धोकादायक झाडझुडपे हटवली. झाडीत पर्यटक व स्थानिकांनी टाकलेल्या प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या, जुने देव्हारे, देवतांचे फोटो आदींचा मोठा कचरा मिळून आला. यामुळे परिसरात विषारी प्राणी संचार करत असल्याचे आढळले. स्वच्छता करताना काटेरी व विषारी झाडेही हटवण्यात आली. श्रीदत्त राऊत, निखिल हडळ, प्रतिक भायदे या दुर्गमित्रांनी दर रविवारी हनुमंत मंदिर परिसरात स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. साडेतीन तास श्रमदान करून सारा कचरा गोळा करून नष्ट करण्यात आला.
---
कोमसापच्या वसई शाखा अध्यक्षपदी प्रकाश पाटील
विरार (बातमीदार) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या अध्यक्षपदाची आणि कार्यकारिणीची निवडणूक वसईतील पापडी येथील हुतात्मा स्मारक येथे जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये साहित्यिक प्रकाश पाटील यांची सर्वानुमते वसई शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी पल्लवी बनसोड-परुळेकर, कार्यवाह शिल्पा पै. परुळेकर, कोषाध्यक्ष सिडनी मोरायस, कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, सहसचिवपदी वीरेंद्र पाटील निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष सायमन मार्टिन आणि माजी अध्यक्षा संगीता अरबूने यांनी कोणतेही पद न स्वीकारता सदस्य म्हणून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. मार्गदर्शकपदी गझलकार ज्योती बालिगा राव व रेमंड मचाडो, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनिलराज रोकडे यांची निवड करण्यात आली. कोमसाप कार्यकारिणी सदस्य म्हणून सुषमा राऊत, विजय खेतले, पद्मजा पाटील व रंजना ठाकूर यांची निवड झाली.
---
१,२३१ नुकसानग्रस्तांना अनुदान मंजूर
विक्रमगड (बातमीदार) : मे आणि जूनदरम्यान विक्रमगड तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे १,२३१ कुटुंबांचे घरांचे नुकसान झाले. यासाठी सरकारकडून एकूण ९१.२२ लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्यातील २०३ लाभार्थ्यांना १०.२४ लाख वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १५६ लाभार्थ्यांचे पॅनकार्ड मिळाल्यानंतर त्यांचेही अनुदान खात्यात जमा होणार आहे. तलाठ्यांना पॅनकार्ड गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---
नावझे गावातील वृक्षारोपण उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग
मनोर (बातमीदार) : माझी वसुंधरा अभियानअंतर्गत नावझे ग्रामपंचायत आणि श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नावझे गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपनाची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे. वातावरणातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्यामुळे पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. निसर्गाची देणगी असलेल्या वृक्षांचे अस्तित्व मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला. भविष्यात वृक्षारोपण आणि संवर्धनाचे उपक्रम राबवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. नावझे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते, साखरे नावझे गिराले दहिसर सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, गावातील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच पाटुगाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.