उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : एकीकडे गणेशोत्सवाची चाहूल लागली असून, मंडळांकडून बाप्पाच्या स्वागतासाठी जल्लोषात तयारी सुरू आहे. या उत्साहाचा अतिरेक शहरातील वाहतूक व्यवस्थेला नाहक ताण देत आहे. शहरातील दोन प्रमुख गणेश मंडळांनी रविवारी परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. यामुळे उल्हासनगर पोलिसांनी ‘उल्हासनगरचा विघ्नहर्ता’ आणि ‘सेव्हन स्टार गणेश मित्रमंडळ’ यांच्यावर गुन्हे दाखल केले.
सध्या उल्हासनगर शहर कोंडीच्या गर्तेत अडकले आहे. अरुंद रस्ते, खड्ड्यांनी भरलेली चौका-चौकांतील वळणे आणि त्यात अवैध पार्किंग या साऱ्यांमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अशा स्थितीत रविवारी दोन्ही मंडळांनी ढोल-ताशे आणि डीजेच्या गजरात मिरवणूक काढली. ही मिरवणूक केवळ परवानगीशिवायच नव्हे, तर पोलिस आयुक्तांच्या स्पष्ट मनाई आदेशांचा भंग करणारी ठरली. वाहतूक अडथळ्यामुळे उल्हासनगर कॅम्प नंबर १ भागात तासन् तास कोंडी होती. परिणामी, नागरिक, रुग्णालयांकडे जाणारे रुग्ण; तसेच शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शहराच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांची रांग लागली होती.
कायद्याच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा. शहरातील नागरिक, व्यापारी आणि मंडळांचे पदाधिकारी यांना गणेशोत्सवात शिस्त पाळण्याचे आवाहन करत पोलिसांनी अशा विनापरवाना मिरवणुकींवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
-------------------------------------------------------------
नियोजनाचा अभाव
उल्हासनगर महापालिकेत नुकतीच वाहतूक नियोजनाबाबत बैठक पार पडली होती. बैठकीतील ठोस कृती योजनांची अंमलबजावणी झाली नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. शहरात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची व्यापाऱ्यांची वर्दळ असते. अशा काळात मिरवणुकांसाठी विशेष परवानग्या, मार्गदर्शक सूचना आणि वाहतूक नियोजनाची गरज असताना यंत्रणांचा हलगर्जीपणा समोर येत आहे.
------------------
शिस्तभंग केल्यास कारवाईचा इशारा
परवानगी न घेता मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन्ही मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. यासोबतच, सार्वजनिक रस्ते अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, असे आरोपही लावले आहेत. गणेशोत्सव हा भक्ती आणि शिस्तीचा सण आहे. परंतु शिस्तभंग करणाऱ्या मंडळाला यापुढे कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा उल्हासनगर पोलिसांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.