क्षेत्रपाल महादेव मंदिर मुरूडकरांचे श्रद्धास्थान
श्रावणानिमित्त भाविकांची गर्दी; धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने वाटचाल
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : ऐतिहासिक जंजिरा किल्ला आणि पद्मदुर्गसारख्या प्रसिद्ध स्थळांसह आता येथील स्वयंभू श्री क्षेत्रपाल महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे.
मुरूडपासून केवळ चार किमी अंतरावर, समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर आता संपूर्ण मुरूडवासीयांचे श्रद्धास्थान बनले आहे. सध्या श्रावण महिन्याच्या निमित्ताने येथे भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
हे मंदिर विहूर ग्रामपंचायत क्षेत्रात असून, याचा इतिहास सुमारे १०० वर्षांहून अधिक जुना असल्याचे बुजुर्ग सांगतात. सुरुवातीला एका झोपडीमध्ये असलेल्या या देवस्थानाचा आजचा देखणा अवतार भाविकांच्या देणगी आणि लोकवर्गणीतून उभा राहिला आहे. मुरूड येथील गजानन रणदिवे यांच्या माहितीप्रमाणे मंदिराचा जीर्णोद्धार भक्तांच्या समर्पणातून झाला आहे. या मंदिरात श्री काळभैरव, खेम, जागृत शंकर आणि विशेषत्वाने स्वयंभू श्री क्षेत्रपाल यांच्या पवित्र पिंड विराजमान आहेच. या पिंडीना १२ ज्योतिर्लिंगांप्रमाणे महत्त्व दिले जाते आणि अनेक भक्तांना येथे आल्यानंतर आध्यात्मिक अनुभूती मिळाल्याचेही सांगितले जाते. मंदिर परिसरात बारमाही पाण्याची विहीर आहे. पावसाळ्यात डोंगरउतारांवरून वाहणारे झरे, हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि फुलपाखरांची रेलचेल यामुळे येथे येणाऱ्यांना वन सहल अनुभवता येते. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे बनले आहे.
.................
रस्त्याअभावी भाविकांची गैरसाय
दरवर्षी येथे महाशिवरात्र व गोकुळाष्टमी मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. या उत्सवात भजन, कीर्तन, महाप्रसाद व फराळाची व्यवस्था होते. पण मंदिरापर्यंत जाणारा रस्ता अजूनही कच्चा असल्याने भाविकांची गैरसोय होते आहे. म्हणूनच स्थानिकांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे पक्क्या रस्त्यासाठी प्रस्ताव दिला आहे. हा रस्ता तयार झाल्यास स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीही वर्दळ वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. श्री क्षेत्रपाल मंदिर हे केवळ मुरूडकरांचे नव्हे, तर संपूर्ण कोकणातील भक्तांचे आध्यात्मिक शक्तिस्थान होण्याच्या मार्गावर आहे. पक्का रस्ता, योग्य सुविधा आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून हे मंदिर एक उत्कृष्ट धार्मिक पर्यटनस्थळ बनू शकते, याबाबत आता जनजागृती वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.