‘इंद्रधनू कार्यशाळेत चांगला माणूस बनण्याचे प्रयत्न वाढवूयात’
सुप्रिया मतकरी विनोद यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : नाटक ही अशी गोष्ट आहे की भले त्यातील कलाकार कसदार दिग्दर्शक, अभिनेता, लेखक बनेल किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही. मात्र, ती व्यक्ती एक चांगला माणूस नक्कीच बनेल. ही कलेची ताकद आहे. इंद्रधनू कार्यशाळेत चांगला माणूस बनण्याचे प्रयत्न आपण वाढवूयात, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सुप्रिया मतकरी विनोद यांनी काढले.
समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने नाट्यजल्लोष अर्थात वंचितांचा रंगमंच या ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी सुरु केलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमास अकरा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त संस्थेतर्फे कलाकार, कार्यकर्ते, सहयोगी व हितचिंतक यांच्याकरता सुरु केलेल्या ‘इंद्रधनू - ३इ’ या वर्षभर चालणाऱ्या मासिक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम होत्या.
प्रकाश योजनेचे काम जवळपास कॅमेरासारखे असते. नाटकाचा पडदा उघडताच किंवा पहिला प्रवेश सुरु होतांना प्रकाश योजनेमुळे नाटक घडण्याचे स्थळ, काळ, वेळ समजते. पात्रांच्या हालचाली व संवादातून व्यक्तिरेखा कळतात. व्यक्तिरेखांमधील संबंध व आपसातील भावभावना स्पष्ट होतात. वेशभूषा सुद्धा महत्वाची असते, असे देखील मतकरी यांनी यावेळी सांगितले. इंदिरा गांधींबद्दल नाटक करायचं झालं तर इंदिरा गांधींचा पेहराव म्हणजे त्यांची साडी, चष्मा, केशरचना हे सर्व महत्वाचे असते. महात्मा गांधीजींचं पात्र रंगवायचं झालं तर त्यांच्या हातातली काठी, पेहराव या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
नेपथ्यामध्ये सुद्धा रंगांचे विशिष्ट अर्थ असतात. पांढरा, काळा किंवा लाल रंग कुठेही व कसेही वापरून चालत नाहीत. त्या त्या प्रसंगाची गरज असेल त्याप्रमाणे वरील सर्व घटक वापरले गेले पाहिजेत. यात दिग्दर्शकाचा दृष्टिकोन महत्वाचा असतो. म्हणून दिग्दर्शकाचे सर्वांनी ऐकणे आवश्यक असते. पुढे नाटक म्हणजे काय याबद्दल सुप्रिया मतकरी विनोद यांनी सगळ्यांना आपापली समज व्यक्त करायला सांगत, त्यातून नाट्यक्षेत्राची एकत्रित समज समृद्ध केली.
विविध कला मुरवणारी कार्यशाळा
कार्यशाळेच्या इंद्रधनू या नावाबद्दल त्यांनी चर्चा केली. संयोजक हर्षदा बोरकर यांनी नाट्यजल्लोषची वैशिष्ट्ये सांगितली. तर, कलेची आवड असणं आणि कला अंगात मुरवणं या वेगवेगळ्या बाबी आहेत. आपल्यात ज्या कला पेरलेल्या आहेत त्या इंद्रधनुष्या प्रमाणे विविध रंगी आहेत. प्रत्येक कला प्रकार निराळा आहे. या कार्यशाळेत शिल्पकला, संगीत, लेखन, अभिवाचन अशा सगळ्या कला आपण शिकणार आहोत. अभिनय असो वा रोजचं नियमित वागणं असो त्यात शब्द व भाषे इतकीच देहबोली महत्वाची आहे. हे सारे आपण आपल्यात मुरवणार आहोत. जीर्णोद्धार या संध्या कुलकर्णी यांच्या नाटकाचे वाचन करत एकीकडे मंदिराचे दृश्य आणि दुसरीकडे पडक्या शाळेचे, यांचे वर्णन करत सगळ्यांना दिग्दर्शकाच्या नजरेने नाटक कसे घडेल ते त्यांनी नंतर दाखवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.