गव्हाण रेल्वेस्थानक सुरू करण्याच्या मागणील जोर
स्थानक उभारणी पूर्णत्वास; मात्र थांब्याबाबत अद्यापही अनिश्चितता
उरण, ता. ४ (वार्ताहर) : उरण ते नेरूळ-बेलापूर रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे ठरणारे गव्हाण रेल्वेस्थानक अद्याप सुरू न झाल्यामुळे जासई व परिसरातील ग्रामस्थांत नाराजीचा सूर उमटत आहे. खारकोपरनंतरचे हे पाचवे स्थानक असूनही येथील नागरिकांना अद्याप रेल्वे थांब्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे स्थानकाचे काम जवळपास पूर्ण असूनही प्रत्यक्ष थांबा कधी, असा सवाल आता तीव्रतेने पुढे येत आहे.
गव्हाण रेल्वेस्थानकातील फलाट, तिकीट घर, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी सुविधा पूर्णत्वाकडे असून, फलाटावरील फरशी पॉलिशचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. तरीदेखील रेल्वे थांबा सुरू झालेला नाही. स्थानकाचे काम पूर्ण असूनदेखील प्रत्यक्ष थांबा जाहीर केला जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानक सुरू झाल्यास उरण तालुक्यातील जासई, गव्हाण, चिरनेर, धावले, आदी गावातील हजारो नागरिकांना प्रवासाच्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र जासईसह आसपासच्या १० गावांतील नागरिक, विद्यार्थी, व रोजंदारीसाठी मुंबईत जाणारे कामगार हे अजूनही खारकोपर स्थानकावर अवलंबून आहेत. त्यामुळे स्थानक सुरू होईपर्यंत होणारी गैरसोय टळलेली नाही. स्थानक सुरू झाल्यास या भागातील नागरिकांचा प्रवास वेळ आणि पैशांच्या बचतीसह अधिक सुलभ होईल, असे ठाम मत नागरिकांनी व्यक्त केले.
................
उरण-खारकोपर मार्ग जरी १२ जानेवारी २०२४ रोजी सुरू झाला असला, तरी गव्हाण स्थानक मात्र अनेक वर्षांपासून रखडलेले होते. सुरुवातीला भूसंपादनाच्या अडचणी, नंतर शेतकऱ्यांना मोबदल्याचे भूखंड न मिळणे यामुळे हे स्थानक दीर्घकाळ अंमलबजावणीत अडकले होते. अखेर स्थानिकांच्या संघर्षामुळे कामाला गती आली, मात्र आता प्रत्यक्ष रेल्वे थांबाच न झाल्याने नागरिक पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित माहिती घेऊन कळवतो, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे स्थानकाचे काम पूर्ण असूनही त्याचे लोकार्पण आणि प्रत्यक्ष सेवा कधी सुरू होणार, यावर अनिश्चितता कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.