चांदिवलीत कावडयात्रेत हजारो भाविकांचा सहभाग
‘हर हर महादेव, बम बम भोले’चा गजर
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. १०) भव्य कावडयात्रा काढण्यात आली होती. यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला. सहभागी झालेल्या लोकांनी ‘हर हर महादेव, बम बम भोले’ असा गरज केला.
सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते काजूपाडा पाइपलाइन, श्री शंभो महादेव मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, काजूपाडा, कुर्ला (प.) या मार्गावर ही कावडयात्रा निघाली. उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. कावडयात्रेसाठी खास तीर्थक्षेत्र काशीवरून पवित्र जल आणून श्री शंभो महादेव महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पर्यायाने महाराष्ट्रात असलेल्या हिंदुत्ववादी शिवसेना-भाजप सरकारच्या पाठीशी भगवी शक्ती एकत्र करण्यासाठी या कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, असे आमदार, विभागप्रमुख दिलीप लांडे म्हणाले. या वेळी माजी नगरसेविका शैला लांडे, युवासैनिक प्रणव लांडे, प्रयाग लांडे, उत्तर भारतीय संघ चांदिवलीचे पदाधिकारी अध्यक्ष रामप्रसिद्ध दुबे, सचिव भास्कर सिंह, महिला तालुकाध्यक्ष सरिता मिश्रा आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.