नेरूळमध्ये दोन दिवसीय श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा
नेरूळ बातमीदार : नेरूळ सेक्टर १५ येथील इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात यावर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. १५ आणि १६ ऑगस्ट या दोन दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमांपूर्वी १० ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ वाजता काकडा, दुपारी ३ ते ४ नामयज्ञ, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि त्यानंतर महाआरती होत आहे. रात्री साडेसात ते साडेनऊ या वेळेत ह.भ.प. नारायण महाराज काळे यांच्या वाणीतील श्रीकृष्ण विषयक संगीतमय कथा रंगतदार वातावरण तयार करत आहे. श्रीकृष्ण जयंतीनिमित्त १५ ऑगस्ट रोजी विशेष जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. नारायण महाराज काळे यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर दिंडी सोहळा काढला जाईल आणि कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने केला जाईल. मंदिर समितीने सर्व भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नेरूळ सेक्टर १९ येथील श्रीकृष्ण चक्रधर सेवा मंडळ ट्रस्ट संचालित श्रीकृष्ण मंदिरातही १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन होणार असून भक्तांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
...............
करंजाडेत दोन नवीन बगीच्यांचे उद्घाटन
पनवेल (बातमीदार) ः करंजाडे गावातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी दोन नवीन लहान बगीच्यांचे उद्घाटन आमदार महेश बालदी आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच मंगेश शेलार यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या उद्घाटनप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या काही महिन्यांत करंजाडे येथे रस्त्यांचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे, बगीचे, पाणीपुरवठा सुधारणा आदी महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. पाणीटंचाईच्या समस्येत ८० टक्क्यांहून अधिक दिलासा मिळाल्याचे सरपंचांनी नमूद केले. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उरण नाका–पनवेल मार्गावर नवीन पूल बांधकामाला सुरुवात झाली असून, पुढील पाच महिन्यांत ते काम पूर्ण होणार आहे. तसेच मोठ्या बगीच्याचे काम सुरू असून, लवकरच ते नागरिकांसाठी खुले होणार असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. या उपक्रमांमुळे करंजाडेच्या नागरी सोयींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कर्णा शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भोईर, तुषार नागे, कृष्णा पाटील, सत्यजित पाटील, विक्रम मोरे, मनोज घुगे, बंटी प्रबळकर, प्रदीप गावडे, निनाद मुंबईकर, सुषमा मयेकर, रश्मी गुप्ता, ज्योती तातरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
...........
शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुदतवाढ द्यावी : गवते
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) माजी नगरसेवक जगदीश गवते यांनी केली आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शाळेची सही-शिक्का घेऊन पुन्हा फायनल अर्ज सादर करावा लागतो. तसेच उत्पन्नाचा दाखला मिळविण्यास वेळ लागत असल्याने अनेक विद्यार्थी अडचणीत आहेत. सायबर कॅफेमधील सर्व्हर समस्या व गर्दीमुळे विद्यार्थी ताटकळत राहतात आणि यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ वंचित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गवते यांनी महापालिका आयुक्तांकडे अर्ज सादरीकरणाची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे.
.................
सानपाड्यात वृक्षदिंडी व वृक्षारोपण उत्साहात
जुईनगर (बातमीदार) ः सानपाडा येथील रेयान शाळेतील विद्यार्थी व ‘निसर्ग फाउंडेशन’च्या पुढाकाराने वृक्षदिंडी काढून ८० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. अशोक, पेरू, फणस, जांभूळ व नारळाची झाडे लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक, सचिव चंद्रकांत सरनोबत, खजिनदार सुमित राणे आदींनी निसर्गाचे महत्त्व स्पष्ट केले. शाळेचे शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
................
नेरूळ मुख्य चौकातील खड्ड्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष
जुईनगर (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर १०, १०ए व २० परिसरातील मुख्य चौकातील छोटे परंतु त्रासदायक खड्डे अद्याप तसेच आहेत. पालिकेने शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजवले असले तरी या चौकातील काही खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. वाहनांचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडी होते, विशेषतः संध्याकाळच्या वेळी परिस्थिती बिकट होते. स्थानिकांनी त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे. मेपासून जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून चांगलीच उसंत घेतली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील पडलेल्या खड्ड्याने बुजवण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून जवळपास अनेक ठिकाणचे खड्डे पालिकेने बुजवले आहेत. मात्र, नेरूळ सेक्टर १०, १० ए आणि २० सेक्टरच्या कोपऱ्यावर असलेल्या खड्ड्यांकडे मात्र पालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुडविल इमारतीसमोर आणि शेजारी हे खड्डे पडले आहेत. हे खड्डे छोटे-छोटे असले तरी या खड्ड्यांमुळे येथे वाहनांची गती कमी होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. संध्याकाळी या चौकात नागरिकांची प्रचंड गर्दी असते. या गर्दीतून वाट काढणे नागरिकांना फारच जिकिरीचे वाटते.
..................
खारघरमध्ये आयुष्यमान कार्ड वाटप उपक्रम
खारघर (बातमीदार) ः आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमधील ‘मनुस्मृती वृद्धाश्रम’ येथील ज्येष्ठांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले. भाजपचे किरण पाटील व माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठांनी व्हिडिओ कॉलद्वारे आमदार ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. कार्ड तयार करण्यासाठी दिनेश यादव व नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.
................
खारघरमध्ये आज तिरंगा पदयात्रा
खारघर (बातमीदार) ः स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघर तिरंगा यात्रा सन्मान समिती व खारघर रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशनतर्फे आज ( ता. १३) सकाळी ९ वाजता तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलपासून सुरू होऊन गावदेवी मैदान येथे समाप्त होईल. स्थानिक रहिवासी, शैक्षणिक व सामाजिक संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.