पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती कार्यशाळेला प्रतिसाद
चार हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
सकाळ वृत्तसेवा,
डोंबिवली, ता. १३ : गणेशोत्सवानिमित्त शाळांमध्ये पर्यावरणपूक मूर्तींबाबत जनजागृती व्हावी, यासाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या कार्यशाळांमध्ये मुलांना आपल्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवण्याचा आनंद घेता येतो. यंदा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत ४,६५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही कार्यशाळा कै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील कै. सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त सभागृहात मंगळवारी (ता. १२) अंगारक चतुर्थीच्या दिवशी आयोजित केली होती. महापालिकेच्या शाळा, खासगी शाळा आणि विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सकाळी ८ वाजल्यापासून सभागृह चिमुकल्यांच्या आनंदाने गजबजले होते. शाडू मातीपासून श्री गणेशाच्या मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांची तन्मयता आणि कला कौशल्य पाहण्यासारखी होती. या उत्साही वातावरणात आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, पोलिस उपआयुक्त अतुल झेंडे यांनीही कार्यशाळेला भेट देत उपक्रमाची प्रशंसा केली. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी “पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा व्हावा, जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची जाणीव निर्माण व्हावी,” असे सांगत “हरित बाप्पा, फलित बाप्पा” या संकल्पनेवर या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे म्हटले.
क्षतिज गतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेत आपल्या हातांनी अत्युत्कृष्ट गणपतीच्या मूर्ती साकारल्या. याआधी बंगळूर येथील पोल्यूशन कंट्रोल बोर्डच्या ३,३०८ पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा जागतिक विक्रम या कार्यशाळेत मोडीत निघाला. येथे ९१ शाळांतील ४,६५७ विद्यार्थ्यांनी मूर्ती साकारल्यामुळे या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. कार्यशाळा सकाळी ८:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. ज्यामध्ये एकूण ५,२४५ जण सहभागी झाले. याचीही दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, उपआयुक्त संजय जाधव, समीर भुमकर, वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहा. आयुक्त प्रिती गाडे, हेमा मुंबरकर, राजेश सावंत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मूर्तिकार सचिन गोडांबे, मिनल लेले, शेखर ईश्वाद, संतोष जांभुळकर आणि गुणेश अडवळ यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याबाबत मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.