मुंबई

बदलापूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात

CD

बदलापूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात
वर्षभरात चौथ्यांदा वायूगळती; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, नागरिक त्रस्त
बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : जुन्या, जीर्ण आणि खराब स्थितीत असलेल्या इमारतींमधून आणि त्याच ठिकाणी चालू असलेल्या एमआयडीसी कंपन्यांमुळे बदलापूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. शिरगाव, आपटेवाडी, भोसलेनगर, खरवई, मानकीवली, जुवेली या प्रभागांतील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमुळे शहरात वायुप्रदूषण वाढत आहे. वर्षभरात साधारण चौथ्यांदा वायूगळतीचे प्रकरण समोर आले असून, मंगळवारी (ता. १२) रात्री जवळपास पाच ते सहा किलोमीटरचा परिसर हा प्रदूषणकारी वायूच्या गर्तेत आला होता. मार्च २०२५मध्ये विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शहरातील २४ कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली; मात्र असे असूनही आजही या कंपन्यांकडून सर्रासपणे नियम धाब्यावर बसवून रासायनिक वायू हवेत सोडला जात आहे.

बदलापूर शहराचे क्षेत्रफळ ३५.६८ चौ. किमी असून, येथील निसर्गसौंदर्य, शुद्ध हवा आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा यामुळे हे शहर ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक शहरीकरण झालेले आहे; मात्र लोकसंख्येच्या आसपास असलेल्या एमआयडीसी कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत. एमआयडीसी परिसरात सुमारे ३०० कंपन्या आहेत. त्यापैकी बऱ्याच कंपन्या जुनाट व जीर्ण इमारतींमध्ये आहेत. अनेक यंत्रणाही खराब झाल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वायूगळतीची घटना घडत असून, रासायनिक वायू हवेत सोडले जात आहेत. त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. मंगळवारी (ता. १३) रात्री साडेनऊ वाजल्यापासून भोसलेनगर, शिरगाव, आपटेवाडी, पनवेल रिंग रूट, कात्रप अशा परिसरात धूरकट वातावरण पसरले. अनेकांना श्वास घेण्यात त्रास, डोळे चुरचुरणे यांसारखे त्रास जाणवले. रात्री १२ वाजताच्या सुमारास वायुप्रदूषण थोडे कमी झाले.

मार्च २०२५मध्ये विधान परिषदेत बदलापूरमधील २४ कंपन्यांवर कारवाईची माहिती दिली गेली होती. त्यापैकी पाच कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याचे आदेश, पाच कंपन्यांना अंतरिम आदेश, पाच कंपन्यांना प्रस्तावित आदेश आणि नऊ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. रिलायबल गॅल्वनायझर अँड फास्टनर कंपनीवर ॲसिडिक वायू उत्सर्जनामुळे कडक कारवाई केली आहे, तरीही नियमांचे उल्लंघन सुरू आहे. प्रदूषणामुळे बदलापूर शहरातील हजारो नागरिकांना श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये (दमा, सायनस, खोकला) त्रास होत आहे. पूर्वेकडील भागातील हवेचा निर्देशांक सतत १५० पेक्षा जास्त आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ आणि २०२५च्या वेगवेगळ्या तारखांना वायूगळतीच्या चार प्रमुख घटना घडल्या होत्या. त्या घटनांमुळे नागरिकांना मोठा श्वसनाचा त्रास झाला.

हवेच्या निर्देशांकात बदल
बदलापूर पूर्वेकडील एमआयडीसीलगत असलेल्या रहिवासी भागात हवेचा निर्देशांक हा नेहमीच १५०च्या वरच असतो. त्यामुळे स्वच्छ हवा, चांगले वातावरण आणि कमी किमतीत मिळालेली घरे या आशेने राहायला आलेल्या अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत.

वायूगळतीच्या घटना
मागील वर्षी ११ डिसेंबर २०२४मध्ये नायट्रोजन डायऑक्साइड या रासायनिक वायूगळतीची घटना घडल्यानंतर टीनको या कंपनीवर गुन्हा दाखल केला होता.
दुसरी घटना २५ मे रोजी घडली होती. या वेळीदेखील वायूगळतीमुळे वातावरण प्रदूषित झाले होते. उग्र दर्प आणि धूसर हवा त्यामुळे नागरिकांना श्वसनाशी संबंधित त्रास होत होता.
तिसरी घटना २६ जुलै रोजी घडली होती. या वेळीदेखील रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एमआयडीसी कंपनीमधून रासायनिक वायू थेट हवेत सोडण्यात आला. या वेळी अनेकांना खोकला, डोळे चुरचुरणे असा त्रास होऊ लागला होता.
आता चौथी घटना ही मंगळवारी घडली असून, वायूगळती होऊन जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर हवा धुरकट झाली होती.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बदलापूर अधिकारी जयंत कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी म्हटले, की रात्री परिसरातील नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर आम्ही या परिसरात निरीक्षण वाहन तैनात ठेवले आहे; मात्र अद्याप हा वायू कोणता आणि वायूगळती झालेली कंपनी कोणती, याबाबत तपशीलवार माहिती मिळालेली नाही. साधारण पुढील २४ तासांत संपूर्ण माहिती समजेल. हा प्रकार समोर आल्यावर प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपनीवरदेखील कठोर कारवाई केली जाईल. मात्र पावसाळी वातावरणात अपघातानेदेखील अशा घटना घडतात, अशी माहिती दिली.

रात्री अचानक धुके पसरले होते. प्रचंड उग्र वास या हवेतून येत होता. यामुळे श्वास घ्यायला त्रास, डोळे चुरचुरणे असा त्रास होऊ लागला. एमआयडीसी कंपन्या या आमच्या परिसरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहेत. प्रशासनाने या कंपन्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी.
- मनाली राणे, स्थानिक रहिवासी, पनवेल रिंग रूट परिसर

एमआयडीसी कंपन्यांपासून आमचे घर साधारण एक ५०० मीटर अंतरावर आहे. भोसलेनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात बैठी घरे आहेत. दाटीवाटीने पसरलेल्या घरांमध्ये रात्रीच्या वेळेत वायुप्रदूषण झाल्यानंतर मोठा त्रास सहन करावा लागतो. घरातील मुलाबाळांना आणि विशेषकरून वयोवृद्ध नागरिकांना याचा खूप जास्त त्रास होतो. जोपर्यंत हा रासायनिक वायू हवेत असतो तोपर्यंत श्वास घेण्यास त्रास होतो. घशाला खवखव जाणवते, उलट्या होतात.
- संजय वानखेडे, स्थानिक रहिवासी शिरगाव

प्रदूषणाबाबत झालेली कारवाई
दंडात्मक कारवाई २४
उत्पादन बंद ५
अंतरिम आदेश ५
प्रस्तावित आदेश ५
कारणे दाखवा नोटीस ९
.........................
वायुप्रदूषणामुळे त्रस्त परिसर
भोसलेनगर
शिरगाव
आपटेवाडी
पनवेल रिंग रूट
कात्रप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन

Pune : जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर; मित्रासह दोघांना अटक

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT