वाशी पोलिस ठाण्यात जप्त वाहनांचा लिलाव
१६ ऑगस्टला होणार विक्री प्रक्रिया
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत घडलेल्या दरोडा, जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली वाहने अखेर लिलावासाठी उपलब्ध होणार आहेत. बेलापूर न्यायालयाने याबाबत आदेश जारी केल्यानंतर, वाशी पोलिसांकडून १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.
या लिलावात एक मारुती कार, होंडा अॅक्टिवा, बजाज पल्सरच्या दोन गाड्या, तसेच हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण पाच वाहनांचा समावेश आहे. ही सर्व वाहने संबंधित गुन्ह्यांशी निगडित असल्याने जप्त करण्यात आली होती, मात्र प्रकरणांचा निपटारा झाल्यानंतरही मालकांनी वाहनांच्या ताब्यासाठी अर्ज न केल्याने ही वाहने वर्षानुवर्षे पोलिस ठाण्याच्या परिसरात पडून होती. त्यामुळे त्यांचा योग्य उपयोग होत नव्हता आणि परिसरातील जागादेखील व्यापली जात होती. पोलिस ठाण्याच्या आवारात दीर्घकाळ ठेवलेल्या या वाहनांमुळे केवळ जागेचा प्रश्न निर्माण झाला नाही, तर त्यांची देखरेख आणि सुरक्षा करणेदेखील पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. यामुळे वाशी पोलिसांनी बेलापूर न्यायालयाकडे लिलावाची परवानगी मागितली होती. न्यायालयाने त्यास मान्यता देत वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्याचे आदेश दिले. लिलाव प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून, केवळ नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वैध परवानाधारक नागरिकांनाच सहभागाची संधी देण्यात येईल. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
..............................
वाशी पोलिसांच्या या उपक्रमामुळे जप्त वाहनांचा योग्य वापर होण्यासोबतच, पोलिस ठाण्याची जागा मोकळी होऊन इतर आवश्यक शासकीय कामांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच इच्छुक खरेदीदारांना कायदेशीर पद्धतीने कमी किमतीत वाहने मिळविण्याची संधी मिळणार आहे. अशा लिलावांमुळे न्यायालयीन प्रक्रियेनंतर उरलेली जप्त मालमत्ता उपयोगात येते आणि शासकीय महसूलही वाढतो, असा अनुभव पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.