पपनसाच्या उत्पादनात लक्षणीय घट
सततच्या पावसामुळे फळांची गळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
मेघराज जाधव ः सकाळ वृत्तसेवा
मुरूड, ता. १७ ः कोकणातील पारंपरिक आणि आरोग्यदायी फळांपैकी पपनसचे उत्पादन सध्या संकटात सापडले आहे. रायगड जिल्ह्यात पपनस उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुरूड, अलिबाग, रेवदंडा, भोईघर व नांदगाव परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात पपनसाची झाडे आढळत असत; मात्र आता केवळ मोजक्या बागांतच ही झाडे शिल्लक राहिली आहेत.
सण-उत्सवात पारंपरिक फळांना कोकणात आवर्जून मागणी असते, त्यापैकीच एक पपनस होय; मात्र वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे सध्या पपनसाची झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. पूर्वी पपनसाची झाडे प्रत्येक वाडीत दिसायची; मात्र आता अनेकांच्या बागांतून ही झाडे हद्दपार झाल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात तयार होणाऱ्या पपनसाच्या फळांना दमट हवामान आणि सततच्या पावसामुळे गळ व कीड रोग जडत आहे. यामुळे तयार फळे झाडावरून लवकर गळतात, पोखरलेली असतात आणि बाजारात विक्रीयोग्य राहत नाहीत. यंदा मे महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे फळगळतीचे प्रमाण अधिक वाढले आहे.
कोकण किनारपट्टीवर काही वर्षांपूर्वी पपनसाच्या झाडांची संख्या मोठी होती. आता केवळ काकळघर आणि भोईघर येथील बागायतदारांनी ही झाडे ठेवली आहेत. संपूर्ण मुरूड तालुक्यात पपनस झाडांची जेमतेम ३००च्या घरात संख्या असावी. नवीन लागवडच होत नसल्याने दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होईल, अशी चिन्हे आहेत. पपनसाच्या एका झाडाला सरासरी ५० ते ६० फळे येतात आणि एका फळाला ८० ते १०० रुपये दर मिळतो. गणेशोत्सव, नवरात्रीसारख्या सणांमध्ये पपनसाला मागणी अधिक असते; मात्र यंदा झाडांची संख्या आणि फळांची गुणवत्ता दोन्ही घटल्याने शेतकऱ्यांचे प्रत्येकी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.
ओवशांच्या सुपात मान
विशेषतः कोकणातील गौरीच्या ओवशांच्या सुपामध्ये पपनसाच्या फळांना मोठे स्थान मिळते. गणपतीच्या मखराचीही पपनसाची पिवळी हिरवी फळे शोभा वाढवितात. ऐन पावसाळी हंगामात ही फळे तयार होत असल्याने अशा दमट वातावरणात तयार फळांना कीड लागते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे तयार फळांना गळ लागते. अळ्यांनी पोखरल्याने फळे नासण्याची शक्यता जास्त असते. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे साहजिकच पपनस फळांची गळ वाढली आहे.
बहुगुणी फळ
पपनस हे संत्र मोसंबी असे लिंबूवर्गीय रसदार फळ आहे. प्रामुख्याने आशिया खंडात आढळते. तापात जसे मोसंबी, डाळिंब ही फळे पथ्य किंवा पौष्टिक म्हणून देतात, तसेच पपनसही आरोग्यवर्धक आहे. यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व सी आणि बी-६ पोटॅशियम, पाचक फायबर, मॅग्नेशियम आदींचा समावेश आहे.
नवरात्रोत्सवात मोठी मागणी
साधारण सप्टेंबरमध्ये ही फळे पिकून तयार होत असल्याने गणेशोत्सव त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्रोत्सवात मोठी मागणी असते. अलीकडेच कृषी विद्यापीठाने पपनसाची नवीन जात विकसित केली आहे. त्याची लागवड केल्यास उत्पन्न वाढू शकते, असे शेतकरी गटप्रमुख उल्हास वारगे यांनी सांगितले. आमच्या बागेत ४० वर्षांपासून चार झाडे आहेत. झाडांसाठी सेंद्रिय खताचा वापर करतो. अनेक ग्राहक घरी येऊन फळांची खरेदी करतात. नवरात्रोत्सवात ओटी भरण्यासाठी पपनसाला विशेष मान आहे. त्यामुळे या काळात फळाला मागणी वाढते, असे विलास जोशी या बागायतदारांनी सांगितले, तर पपनसाचे झाड अधिक जागा व्यापते. गौरी, गणपतीव्यतिरिक्त मागणी नसते. त्यामुळेदेखील नवीन लागवडीसाठी शेतकरी धजत नसल्याची प्रतिक्रिया सुरेश बाळकृष्ण वर्तक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.