ठाण्यात विश्वविक्रमी थरथराट
‘कोकणनगरचा राजा’चे १० थर; २५ लाखांचे बक्षीस जिंकले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : एकावर एक नऊ थर चढले आणि दहाव्या थरासाठी गोविंदा सरसावला... एकीकडे गो गो गोविंदाचा वाढता आवाज तर दुसरीकडे काळजाचा ठोका चुकवणारी धाकधूक... अशा रोमांचकारी उत्साही वातावरणात ठाण्यात अखेर १० थरांचा विश्वविक्रम रचला गेला. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने आधीच्या नऊ थरांचा विक्रम मोडून ‘विश्वविक्रमी’ सलामी दिली. या पथकाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखांचे बक्षीस जाहीर केल्याने एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
गोविंदांसाठी दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाण्यात दरवर्षीप्रमाणे तोच जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला. टेंभीनाका येथील मानाची दहीहंडीसह शहरात ठिकठिकाणी मोठमोठ्या दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. लाखो रुपयांच्या बक्षिसाचे लोणी चाखण्यासाठी सकाळपासूनच ठाण्यात गोविंदा पथकांचे जथ्थेच्या जथ्थे दाखल झाले होते. सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत शहरात अनेक ठिकाणी गोविंदा पथकांचा थरथराट पाहायला मिळाला. या सर्वांमध्ये ‘संस्कृती’ने बाजी मारून ठाण्याला पुन्हा ‘विश्वविक्रम’चा मान मिळवून दिला.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथे संस्कृतीच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीसाठी आयोजकांनी लाखो रुपयांचे बक्षीस आधीच जाहीर केले हाेते. काही वर्षांपूर्वी येथे नऊ थरांच्या विक्रमाची नोंद जागतिक स्तरावर झाली होती. तेव्हापासून हा विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम रचला जावा, यासाठी आयोजक प्रयत्नशील होते. तीन वर्षांपासून यासाठी बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली होती. यंदा १० थर लावून नवीन विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने हे स्वप्न पूर्ण करून नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
-----
हा क्षण गौरवाचा!
गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. १० थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे तर संपूर्ण देशाची शान आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे यांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. आजचा क्षण तर अत्यंत गौरवाचा आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
----
आमच्या मंचावर नऊ थरांचा विक्रम झाला हाेता. आज हा विक्रम १० थरांच्या नव्या उंचीवर पोहाेचल्याचा अभिमान आहे. कोकणनगरच्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालून महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे.
- पूर्वेश सरनाईक, अध्यक्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान
-----
शिस्तबद्ध सरावाला यश
२०२२मध्ये इथेच नऊ थर लावले होते. त्यामुळे यंदा १० थर लावायचे हे मनाशी पक्के केले होते. प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांपासून सराव करून हे यश मिळाले. या वेळी आमच्या पथकात ५५० गोविंदा होते. एकही गोविंदा जखमी न हाेता आम्ही विश्वविक्रम रचला, याचा आनंद आहे. हा क्षण आमच्यासाठी जल्लोषाचा आणि भावनिक असल्याचे कोकणनगरचा राजा पथकाच्या गोविंदांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.