ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला
राजकीय नेत्यांसह कलाकारांची हजेरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः उत्सव, उत्साह आणि जल्लोषात व वरुणराजाच्या साथीने ठाणे शहरासह जिल्ह्यात दहीहंडीतील थरांचा थरथराट अनुभवायला मिळाला. मुंबईपेक्षा उंच हंड्या आणि थरारक चढाई करीत हंडीतील लाखोंचे लोणी चाखण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, वसई-विरार अशा ठिकाणांहून गोविंदा पथके ठाण्यात दाखल झाली होती. टेंभीनाक्यावर मानाच्या हंडीच्या ठिकाणी पहिली सलामी दिल्यानंतर गोविंदा पथके इतर ठिकाणी जाताना दिसली. टेंभीनाका, हिरानंदानी मेडोज आणि कॅसल मिल येथील गोकुळनगरच्या दहीहंडीतदेखील राजकीय नेत्यांची हजेरी आणि कलाकारांची हजेरी लक्ष वेधून घेणारी ठरली. या वेळी अनेक दहीहंडी उत्सव मंडळांकडून गोविंदांचे मनोरंजन करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्याक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले असल्याचे दिसून आले.
हवामान खात्याने शनिवारी (ता. १६) ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यात शुक्रवारी (ता. १५) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवारीदेखील दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे गोविंदांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला होता. मुंबई व आजूबाजूच्या परिसरातून टेम्पोने, दुचाकीवरून गोविंदा पथके ठाण्यात दाखल होत होती. या वेळी ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम, झांज आणि रंगीबेरंगी पोशाखात सजलेली पथके यांच्यासह तसेच ‘गोविंदा आला रेऽऽ आला’चा गजर घुमत होता. टेंभीनाका येथील आनंद दिघेसाहेबांची दहीहंडी, संस्कृती प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, गोकुळ हंडी, स्वामी प्रतिष्ठान जांभळी नाका यांसारख्या ठिकाणी गर्दी झाली होती. हजारो नागरिकांनी मैदान आणि रस्ते गच्च भरून निघाले होते. सुरुवातीला सहा-सात थरांची सराईत रचना गोविंदांनी केली आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. काही पथकांनी आठ थर गाठले, तेव्हा क्षणभर मैदानात श्वास रोखून धरल्यासारखे वातावरण झाले होते.
यंदा महिला गोविंदाही मागे राहिल्या नाहीत. त्यांच्याही पथकांनी सहा ते सात थरांची सलामी देत आम्ही कुठे कमी नाही, हे दाखवून दिले. महिलांची धडाडी आणि आत्मविश्वास पाहून नागरिकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. उत्सवातील थरार जितका मोठा होता, तितकाच सुरक्षिततेवरही भर दिला गेला. पथकांभोवती सुरक्षेसाठी जाळ्या, मॅट्स, स्वयंसेवक तैनात होते. ठाणे महापालिका, पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सदैव सज्ज होत्या.
कलाकारांच्या प्रतिक्रिया
वर्षानुवर्षे या उत्सवाचा उत्साह वाढतच आहे. ही या ठाण्याची जादू आहे. गोविंदा जसे स्वत:ला फिट ठेवतात, तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील स्वत:ला फिट ठेवले आहे. या उत्सवाचा उत्साह कधीच कमी होणार नाही.
- सुनील शेट्टी, अभिनेता
मी दरवर्षी या उत्सवामध्ये येतो. या सर्वांचा उत्साह खूप छान आहे. स्वत:ला सांभाळा आणि उत्सव साजरा करा, असा संदेश यानिमित्ताने मला द्यावासा वाटतो.
- प्रसाद ओक, अभिनेता
जे प्रेम इथे मिळाले ते प्रेम आतापर्यंत कुठेच मिळाले नाही आणि कुठेही मिळणार नाही. तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थने हीरो आहात. खरे हीरो नंबर वन हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.
- गोविंदा, अभिनेता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे असतात. मराठीमध्ये खूप चांगले चित्रपट येत आहेत. हे सर्व चित्रपट तुम्ही बघा, लहानपणी मीसुद्धा थर लावायचो. हेच थर आयुष्यात महत्त्वाचे यश मिळवून देणार आहेत.
- सिद्धार्थ जाधव, अभिनेता
मी सर्वांना मनापासून या उत्सवाच्या शुभेच्छा देतो. टेंभीनाका दहीहंडी उत्सवात दरवर्षी तोच उत्साह पाहायला मिळतो.
- शरद केळकर, अभिनेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.