खासगी बसमध्ये बसवणार कॅमेरे
अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात परिवहन विभाग विचाराधीन
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः सणासुदीसह सुट्टीच्या कालावधीत प्रवासासाठी खासगी बसला प्रवाशांची पसंती असते. प्रवासी मागणी लक्षात घेऊन अवैध प्रवासी वाहतूक आणि अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते, मात्र याला लवकरच ब्रेक लागणार आहे. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी खासगी बसमध्ये कॅमेरे बसवण्याचा परिवहन विभाग विचाराधीन आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी माहिती दिली.
मुंबईत अवैध प्रवासी वाहतूक जोरात असून, आरटीओकडून २,८३८ वाहनांची तपासणी केली. यामध्ये २१.७० लाखांची वसुली, तर ६२ चालकांचे अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी खासगी बसमध्ये कॅमेने लावून त्याद्वारे अवैघ प्रवास वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यंत्रणा सातत्याने कोलमडत असल्याने खासगी वाहतूकदार कार्यरत झाले आहेत. यात नियमांना पायदळी तुडवत खासगी बस वाहतूकदार प्रवासी वाहतूक करत आहेत. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे खासगी प्रवासी वाहतूकदार मंडळींचे दलाल थेट एसटी डेपोत शिरून प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळवताना पाहायला मिळत आहे. अनेकदा डेपोत जात असलेल्या प्रवाशांना रस्त्यातच अडवून व कमी प्रवास भाड्याचे प्रलोभन दाखवून खासगी वाहतूकदार सर्वसामान्य प्रवाशांना आपल्याकडे खेचत असल्याचे आढळून आले. अशाच बसचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार व मोटार वाहन कायद्यानुसार एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर क्षेत्रात खासगी प्रवासी वाहने उभी केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय एसटीच्या अधिकृत थांब्यावर खासगी वाहने उभी केल्यास कारवाई केली जात आहे, तर खासगी वाहनाची योग्य देखभाग, दुरुस्ती न करता प्रवासी वाहतूक केल्यास कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूट
सरकारने राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार खासगी कंत्राटी बस ऑपरेटर यांनी एसटी महामंडळाच्या भाड्याच्या कमाल दीडपट तिकीटदर आकारावा, असे सूचित केलेले आहे, मात्र तरीही कंत्राटी परवान्यावर नोंद असणाच्या खासगी बसधारकांकडून सुट्टीच्या व सणासुदीच्या काळात प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात येते, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
काय होते तपासणी
परिवहन विभागाच्या खाजगी बस तपासणी मोहिमेत विनापरवाना अथवा परवान्यांचा अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेकटर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर तपासणी, वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर, जादा भाडे आकारणे आदी बाबींची तपासणी करण्यात आली.
असे वापरले जाणार तंत्रज्ञान
गाडीमध्ये कॅमेऱ्यांद्वारे किती प्रवासी ते समजणार आहे. जर एखाद्या वाहनात प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असल्यास संबंधित वाहनाला ई-चलान देण्यात येणार आहे.
अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याने सातत्याने परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे, मात्र त्याला रोख लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याचा विचार आहे. सध्या त्याबाबतचे तंत्रज्ञान उपलब्धदेखील झाले आहे. कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून प्रवासी वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यास ई-चलान आकारले जाणार आहे.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त
===
एप्रिल ते जुलै २०२५
विभाग - ताडदेव - अंधेरी - वडाळा - बोरिवली एकूण
तपासलेली वाहने- ११७३-३८५-६६४-६१६-- २८३८
दोषी वाहने - ४९-५५-१५७- २०६- -४६७
दंडवसुली (लाखात )- २.२० - ३. ७१ -८.१२- २.१०- १६. १३
अनुज्ञप्ती निलंबन - २२-२३-०-१७--६२
परवाना निलंबन - २२-२३-०-९---५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.