वासिंद, ता. २१ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वासिंद स्थानकाजवळ ब्रिटिशकालीन दगडी पुलाला गवत, झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. दिवसेंदिवस जुन्या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला असून लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
ब्रिटिश राजवटीत १८५४ मध्ये वाडीबंदरहून येणारी आगगाडी कसारामार्गे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या या मार्गावर ठिकठिकाणी दगडी भक्कम पूल बांधण्यात आले. चुनखडी आणि चौरस आकाराच्या काळ्या बेसॉल्ट खडकांपासून बनविलेल्या या पुलांवरून वर्षांनुवर्षे लोकल, लांब पल्ल्याच्या मेल आणि मालगाड्या लाखोंच्या संख्येने धावत आहेत. परंतु वासिंदजवळील रेल्वे पुलाच्या दगडी भिंतीला गवत, झाडाझुडपांची मुळे घट्ट धरून बसल्याने धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत रेल्वे पुलाची अवस्था पाहता प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
कसारा मार्गावर तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. तब्बल १२ वर्षे उलटूनही रेल्वे प्रशासनाला काम पूर्ण करण्यात यश आलेले नाही. अजूनही पूल बांधण्याची कामे संथ गतीने सुरू आहेत. त्यात २००२मध्ये वासिंदजवळील रेल्वे पुलाचा काही भाग खचल्याने त्याची डागडुगी करून तात्पुरता सिमेंटचा मुलामा देण्यात आला होता. वासिंद-आसनगाव दरम्यान मलबा वाहून गेल्याने दुरान्तो एक्स्प्रेसचा अपघात झालेला होता. त्यात जीवितहानी झाली नव्हती. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत रेल्वे प्रशासनाने भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
पावसाचे पाणी
वासिंद पश्चिम भागातील सांडपाणी व भातसा उजव्या कालव्याचे पाणी याच ब्रिटिशकालीन पुलाखालील चिंचोळ्या मार्गातून जात आहे. या पुलाला सेंट्रल रिजर्व्ह फंडातून पर्यायी मार्ग बनविल्याने या पुलाखालून वाहतूक कमी झाली आहे. असे असले तरी पावसाचे पाणी पुलाखाली साचते. वर्षभर या पुलाच्या भिंतीना वाहणाऱ्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. साचलेले पाणी उपसण्यासाठी डिझेल पंपाची तरतूद नसल्याने १७० वर्षे जुना पूल जीर्ण होत चाललेला आहे.
पुलाखाली पाणी साचते ही दरवर्षीची समस्या आहे. झाडे वाढली असल्यास स्टेशन प्रबंधकांना सांगून योग्य कारवाई करण्यात येईल. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही.
- सोनु कुमार, उपस्थानक प्रबंधक
वासिंदजवळच्या पुलावर छोटी छोटी झाडे उगवलेली आहेत. ती जर तोडली नाहीत, तर त्यांची मूळ दगडांना घट्ट पकडून राहतील. त्यामुळे पुढे धोका आहे.
- नीलेश निचिते, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.