पनवेलमध्ये वाहतुकीचा बोजवारा
अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा बेकायदा पार्किंग; नागरिकांना मनस्ताप
पनवेल, ता. २० (बातमीदार) ः पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र या रस्त्यांवर दुतर्फा बेकायदा पार्किंग होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतो आहे. महापालिका, वाहतूक विभाग आणि परिवहन यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
महापालिकेच्या हद्दीत पूर्वीची नगर परिषद, सिडको वसाहती आणि २९ गावे समाविष्ट आहेत. ११० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळात विशेषतः सिडको कॉलनीमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा भार अधिक आहे. मुख्य रस्त्यांवर काँक्रीटची कामे सुरू आहेत. या रस्त्यांवर दोन्ही बाजूने बेकायदा पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कामोठे आणि खारघर या नोडमध्ये ही समस्या गंभीर बनली आहे. शिवाय सिडकोने बांधलेल्या एलआयजी प्रकारातील घरांवर नंतर रहिवाशांनी मजले चढवले आहेत. त्यामुळे लोकसंख्या चौपट झाली असून, प्रत्येक कुटुंबाकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. सोसायट्यांमध्ये पार्किंग मर्यादित असल्याने या सर्व वाहनांनी थेट सार्वजनिक रस्त्यांवर ताबा घेतला आहे. परिणामी कळंबोली आणि नवीन पनवेलमध्ये सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची भीषण कोंडी होत आहे.
................
अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग
कळंबोली, कामोठे, खारघर अशा परिसरात हजारो टुरिस्ट परवाने असून, अशा गाड्या सार्वजनिक रस्त्यांवर बिनधास्त पार्क केल्या जातात. काळी-पिवळी टॅक्सी, ओला-उबरच्या गाड्याही त्याच रांगेत सामील झाल्या आहेत. त्यात भर म्हणजे अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही ट्रेलर, टँकर, कंटेनर, लक्झरी बस या रस्त्यांवर पार्क केल्या जातात. यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
...............
कळंबोली सर्कल परिसर कायम कोंडीत
सध्या कळंबोली सर्कल परिसरात रस्त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. मुंब्रा मार्गावरील वाहतुकीचा भार पोलाद बाजारातील सेवा रस्त्यावर वळवण्यात आला आहे. मात्र या रस्त्यालगत अवजड वाहनांचे दुतर्फा पार्किंग असल्याने फक्त एकाच मार्गिकेतून वाहनांना कसाबसा मार्ग काढावा लागत आहे. परिणामी या भागात रोजच्या रोज वाहतूक कोंडीचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
..............
भविष्यातील मोठे संकट
रोडपाली येथील एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी सांगितले, की पनवेल महापालिका क्षेत्रातील विशेषतः सिडको वसाहतींमधील दुतर्फा पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. जर संबंधित शासकीय विभागांनी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर ही समस्या भविष्यात अधिकच गुंतागुंतीची होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.