असल्फा, साकीनाका परिसर जलमय
अनेक वाहनांचे नुकसान; जनजीवन ठप्प
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः मुंबईसह उपनगरांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून, घाटकोपर पश्चिमेतील असल्फा, साकीनाका, चांदीवली, खैराणी रोड या भागांत प्रचंड पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. साकीनाका मेट्रो स्टेशनजवळील नाला ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला.
या नाल्याची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून धोकादायक बनली असून, थोड्याशा पावसातही सांडपाणी, कचरा आणि दुर्गंधी रस्त्यावर पसरते. यावर महापालिकेने विद्युत पंप बसवून नाल्याचे पाणी दुसऱ्या नाल्यात वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पावसाच्या तीव्रतेसमोर हा उपाय अपुरा ठरला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे असल्फा आणि साकीनाका परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून, अनेक दुचाकी पूर्णतः बुडाल्या आहेत. चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असल्फा मेट्रो स्टेशन ते साकीनाका मेट्रो स्टेशनदरम्यानचा अंधेरीकडे जाणारा मार्ग दोन ते अडीच फूट पाण्याखाली गेला. परिणामी वाहतूक ठप्प झाली आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
खैराणी रोडवरील चांदीवली ते पवईदरम्यानचा संपूर्ण मार्ग जलमय झाला असून, या भागातील लहान-मोठे उद्योग, कारखाने व व्यवसायांवर याचा थेट परिणाम झाला आहे. नागरिकांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यात या भागातील नाले व गटारे तुडुंब भरतात. वेळोवेळी निवेदन देऊनही पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न कायम राहिला आहे. आता मात्र प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.