महामुंबईत पावसाचा हाहाकार
वाहतुकीची कोंडी; घरांत पाणी, वीज खंडित
मुंबई, ता. १९ ः सलग दुसऱ्या दिवशी अतिमुसळधार पावसाने महामुंबईमध्ये हाहाकार माजवला. सकल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले, नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. परिणामी, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळाली. रेल्वे, बस आणि अन्य वाहनांमध्ये प्रवासी अडकून पडले. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्याचा परिणाम म्हणून वीज खंडित झाली. दिवसभर संततधार सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळित झाले. पावसाने उसंतच न घेतल्याने नागरिकांचे दिवसभर मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर पाऊस सुरू होता. रस्ते वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली होती. काही ठिकाणी मंदावली होती. रेल्वे सेवा बंद पडल्याने स्थानकांवर गर्दी झाली. मोनोरेल बंद पडल्याने प्रवासी सव्वा तास अडकून पडले होते. मिठी नदी तुडुंब भरून वाहू लागल्याने ३५० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. कुर्ला परिसरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि त्याच वेळी वीज खंडित झाल्याने रहिवाशांचे मोठे हाल झाले. मुंबई विमानतळावरसुद्धा पाणी साचले होते. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री नियंत्रण कक्षात ठाण मांडून होते. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने तेवढाच दिलासा मिळाला; मात्र कामावर जायला निघालेल्या मुंबईकरांचे प्रवासात अडकून पडल्याने मोठे हाल झाले.
नवी मुंबईमधील सायन-पनवेल महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दिघा परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. मुंबई आणि परिसराला शेतमालाचा पुरवठा करणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजारांत पाणी घुसल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे दोन दिवस मालाला उठाव नसल्याने नुकसान वाढले.
रायगडमध्ये दिवसभर पाऊस सुरू होता. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. जिल्ह्यातील अनेक राज्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माणगावमधील ३० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. मुरूडमध्ये दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परिसरातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झेनिथ धबधब्यावर तमिळनाडूमधून आलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मुरबाड हे परिसर जलमय झाले. अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिराच्या गाभाऱ्यात चार फुटांपर्यंत पाणी भरले. भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जागोजाग पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली दिसली. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. ठाण्यात दरड कोसळून एक वृद्ध जखमी झाला. उल्हासनगरमधील १७० घरे पाण्याखाली गेल्याने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
पालघर जिल्ह्यातही दिवसभर पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली. वसई-विरारमध्ये झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला आणि त्याचा परिणाम म्हणून पाणीपुरवठा बाधित झाला. विक्रमगड, मोखाड्यातील नद्यांना पूर आला आहे. मिरा-भाईंदर शहरात तीन ते चार फूट पाणी साचले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. समुद्राला भरती असतानाच शहरात पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. मोखाडा, जव्हार तालुक्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. पालघर जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री फार्मचे पावसामुळे नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.