नाल्याच्या मुख्य प्रवाहाला बाधा
कल्याण, ता. २० (बातमीदार) : विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकासमोरही मोठे कमर्शियल टॉवर निर्माणाधीन आहे. त्यामुळे मुख्य नैसर्गिक प्रवाहाला बाधा होत आहे. परिणामी, साचलेले पाणी मागे फेकले जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाने विकसकांना इमारतींचे निर्माण करताना सर्व नियमांचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली आहे का, असा संतप्त सवाल केला. दरम्यान, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी वालधुनी नदीपात्राची पाहणी केली. विठ्ठलवाडी पुलाजवळ साचलेला कचरा जेसीबीच्या मदतीने काढून टाकण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला.
वालधुनी नदीला आलेल्या पुरामुळे खडेगोळवली विभागातील बहुतांश ठिकाणच्या चाळ परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळित झाले होते. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची वाताहत झाली. १०० फुटी येथील मंगेशी संस्कार समोरील रस्ता, सोनिया कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, शिवशांती कॉलनी, महावीरनगर व शिवमंदिर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.