मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

खालापूरातील नद्या धोक्याच्या पातळीवर; मोरबा धरणातून विसर्ग सुरू
खालापूर, ता. २० (बातमीदार) : खालापूर तालुक्यातील पावसाने बुधवारी नवा विक्रम नोंदवला. माथेरानमध्ये तब्बल ४३८.४ मिमी पाऊस तर खालापूरमध्ये १९० मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे मोरबा धरण शंभर टक्के भरले असून बुधवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले. यावेळी ११२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीत करण्यात आला.
अचानक वाढलेल्या विसर्गामुळे धावरी व पाताळगंगा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या. नदीकाठावरील चौक, जांभिवली, आसरे, धारणी, तुपगाव, असरोटी व कोपरी या गावांना प्रशासनाकडून तातडीचा इशारा देण्यात आला आहे. गावातील नागरिक, शेतकरी व ग्रामपंचायत सदस्यांना दक्षतेचे आदेश देऊन नदीपात्राजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने वयाळ–पौध परिसरातील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढल्याने शेतजमिनी व आसपासच्या रस्त्यांवरही पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस व आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज ठेवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून माथेरान परिसरात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने धरणात पाणी जलदगतीने साचत आहे. मोरबा धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करते. त्यामुळे धरणाची पूर्ण भरलेली क्षमता नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक असली तरी खालापूर व आसपासच्या गावांसाठी पुराचा धोका अधिक वाढला आहे. सध्या परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून असून, सतत माहिती देत आहे. ग्रामपंचायतींमार्फत नागरिकांमध्ये जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे. आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
नाल्याच्या प्रचंड प्रवाहामुळे सूडकोली पूलाचा भाग कोसळला
रोहा, ता. २० (बातमीदार) : रोहा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नद्या-नाले धोकादायक स्थितीतून वाहत आहेत. या सततच्या पावसाचा फटका सूडकोली गावातील ५० वर्षांहून अधिक जुन्या पुलाला बसला. रोहा-रामराज मार्गे अलिबाग या मुख्य रस्त्यावरील या पुलाचा काही भाग नाल्याच्या प्रचंड प्रवाहामुळे कोसळला असून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार आठ महत्त्वाच्या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. त्यात सूडकोली पुलाबाबत धोक्याची नोंद झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी यावरून अवजड वाहनांना या पुलावरून बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे पुलाचा मधला स्तंभ खचला व रचना ढासळली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. पुलावरून हलकी वाहनेही धोकादायक असल्याने प्रशासनाने तातडीने दगड व दोऱ्या लावून मार्ग बंद केला. पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे. या पुलाच्या खचल्यामुळे रोहा, अलिबाग व आसपासच्या गावांतील नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांचे बाजारपेठेकडे जाणे, विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग आणि मालवाहतुकीत अडथळे निर्माण होणार आहेत. पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
....................
धाटाव औद्योगिक वसाहतीत उद्योग-उपक्रम ठप्प
रोहा, ता. २० (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत जलमय झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निचरा व्यवस्था फोल ठरली. त्यामुळे रस्ते, कारखान्यांचे परिसर आणि गटारे पाण्याने भरून गेले आहेत.
विशेषतः नीलिकॉन फूड डाइज, एफ.डी.सी., आयन एक्सचेंज, रोहा डायकेम, राठी डायकेम, बेक केमिकल आदी कंपन्यांच्या आवारात पाणी शिरल्याने उद्योगांवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी कारची चाके पूर्णपणे पाण्यात बुडाली. वाहने उभी करण्यास, मालवाहतूक करण्यास आणि कामगारांना कारखान्यात प्रवेश मिळविण्यास अडचणी आल्या. औद्योगिक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. याशिवाय विद्युत वाहक डीपी पाण्यात बुडाल्याने शॉक लागण्याचा धोका निर्माण झाला होता. कामगारांना दूषित पाण्यातून मार्ग काढावा लागला. नालेसफाई योग्यवेळी न झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असल्याचा आरोप कामगार व स्थानिकांनी केला. अनेक कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाणीही पुराच्या पाण्यात मिसळले. त्यामुळे वसाहतीत वेगवेगळ्या रंगांचे पाणी पसरले होते. कामगार व उद्योगपतींनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
.............
पूरग्रस्‍त खांदाड आदिवासी वाडीतील ८० जणांची सुटका
माणगाव, ता. २० (वार्ताहर) : तालुक्यातील खांदाड आदिवासी वाडी मुसळधार पावसामुळे चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढली गेली. सुमारे ७० ते ८० महिला, पुरुष, लहान मुले व वयोवृद्ध नागरिक जवळपास दहा तास पुराच्या धोकादायक वेढ्यात अडकले होते. सायंकाळी ५ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत स्थानिक प्रशासन, नगरपंचायतीचे कर्मचारी, पोलिस व युवकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ट्यूब, रेस्क्यू बोट व बॅटरीच्या प्रकाशझोतांच्या मदतीने बचाव कार्य पार पडले. या मोहिमेत मुख्याधिकारी संतोष माळी, प्रांताधिकारी डॉ. संदीपन सानप, तहसीलदार दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश मोरे, सारंग कनोजे, प्रमोद मोरे, सुनील पारखे, नितीन चौरे आदी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. शेवटी सर्व कुटुंबीयांना माणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतल्या बचाव छावणीत हलविण्यात आले.
.....................
नेरळ दहिवली ब्रीजवर पुराचा विळखा; वाहतूक बंद
नेरळ, ता. २० (बातमीदार) : उल्हास नदीवरील नेरळ–कळंब मार्गावरील दहिवली पूल बुधवारी पुराच्या पाण्याखाली गेला होता. सकाळपासूनच पुलावरून प्रचंड पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
पोलिसांनी तातडीने पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारून वाहने व नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली. सुरक्षेच्यादृष्टीने येथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला. पुलावरून जाणे धोकादायक असल्याने नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. नेरळ व परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान असाच पाऊस सुरू रहिला तर शेतकऱ्यांचे शेतपिके पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हवामान खात्याने आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT