टिटवाळ्यासहित कल्याणमध्ये पूरस्थिती
टिटवाळा, ता. २० (वार्ताहर) : सलग तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने कल्याण तालुक्यासह टिटवाळा परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे तालुक्याचा बहुतांश भाग जलमय झाला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘आॅरेंज अलर्ट’ जारी केला होता. बुधवारी (ता. २०) दुपारी एकपर्यंत तीव्र मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
टिटवाळ्यासह कल्याण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची भाजीपाला शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे बाजारात माल पोहोचवणे कठीण झाले आहे. तसेच बाजारपेठेत पोहोचलेली भाजी सडल्याने विक्रेत्यांचेही नुकसान झाले. काही विक्रेत्यांना तर विक्री न झालेला माल पावसातच फेकावा लागला आहे.
दूध व्यावसायिकांनाही याचा फटका बसला. रस्ते चिखल व पाण्याने भरले आहेत. त्यामुळे ट्रक अडकल्याने दूध वेळेवर पोहोचले नाही,. परिणामी नागरिकांची गैरसोय झाली आहे. खराब होणाऱ्या या दुधामुळे डेअरी मालकांचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण रोजंदारीवर चालणारे दूधवालेही अडचणीत आले आहेत. दैनंदिन मजुरी करणारे शेकडो मजूर पावसामुळे कामावर जाऊ शकले नाहीत. यामुळे बांधकामे ठप्प आहेत. कारखान्यांत हजेरी कमी आहे. परिणामी कमाई शून्यावर आली आहे. रोजच्या कमाईवर पोट भरणाऱ्या या कुटुंबांना उपासमारीचा धोका निर्माण झाला आहे. नोकरदार वर्गालाही पावसाने झोडपले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने बससेवा उशिराने सुरू आहे.
सततच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. कल्याण, वसई, विरार या भागातील अडीच लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. टिटवाळ्यासह तालुक्यातील अनेक भाग अंधारात आहेत. विजेअभावी मोबाईल चार्ज होत नाहीत, इंटरनेट बंद पडले आहे, त्यामुळे संपर्क साधणेही कठीण झाले आहे. घरात पाणी शिरल्याने स्थलांतर करावे लागलेले नागरिक शासकीय शाळा व मंदिरांचा आसरा घेत आहेत.
पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने काही भागांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. मांडा स्मशानभूमी, स्मशानभूमी वॉटर सप्लाय, पाटील नगर, सुमुख सोसायटी दळवी वाडा, घर आंगण बिल्डिंग, नारायण नगर वॉटर सप्लाय प्लांट, मयूरेश नगर अशा भागांतील ट्रान्सफॉर्मर बंद केले आहेत.
नागरिकांचा खोळंबा
महापालिका व अग्निशमन दलाचे पथक नाले व पाण्याचा निचरा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे; मात्र पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने कल्याण-टिटवाळा परिसरातील दैनंदिन जीवन ठप्प केले आहे. अग्निशमन दल नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवत आहे. कल्याण मुरबाड महामार्गावरची वाहतूक ही आंबिवली-टिटवाळा-गोवेलीमार्गे वळवली आहे; मात्र टिटवाळा गणेश मंदिर रोडवरील पटेल मार्ट परिसरात पाणी तुंबल्याने रस्ता बंद केला आहे. त्यामुळे अनेक बस या ठिकाणी थांबल्या असून, नागरिकांचा खोळंबा झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.