मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई बातम्या

CD

जुईनगरमध्ये झाड कोसळले
जुईनगर, ता. २१ (बातमीदार) : परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (ता. १९) रात्री सेक्टर-२३ मधील जुईपाडा गावाजवळील हरितपट्ट्यातील एक मोठे झाड कोसळले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. झाड रस्त्यावर पडल्याने बापू गृहनिर्माण संस्था व स्मशानभूमी परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पार्किंगमध्ये असलेल्या काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. जुईनगर रेल्वेस्थानकाजवळील हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो, मात्र रात्री उशिरा घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड कोसळल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. स्थानिक अविनाश भालसिंग यांनी तत्काळ सीबीडी बेलापूर अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्वरित पथक घटनास्थळी दाखल झाले व चार जवानांनी झाडाची छाटणी करून रस्ता मोकळा केला. सततच्या पावसामुळे परिसरातील मोकळ्या जागेत झाडे धोकादायक ठरत असून, महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
.....................
जुहूगाव ग्रामस्थ मंडळाची स्वच्छता मोहीम
तुर्भे, बातमीदार : जुहूगाव ग्रामस्थ मंडळ व नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली. मोहिमेची सुरुवात जुहूगाव मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शपथ देऊन झाली. त्यानंतर प्रभातफेरी काढून ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात आले. या उपक्रमात शेकडो नागरिक, मंडळाचे पदाधिकारी, महापालिकेचे कर्मचारी व शालेय विद्यार्थी सहभागी झाले. गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, खेळाचे मैदान व शाळा परिसरात साफसफाई करण्यात आली. गावाची स्वच्छता ही केवळ आरोग्याशी नव्हे तर प्रतिष्ठेशी निगडित आहे, असे ग्रामस्थांनी नमूद केले. यावर्षी गावातील रामा नामा भोईर विद्यालयाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वात स्वच्छ शाळा, हा मान पटकावला असल्याने या प्रेरणेने मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. संपूर्ण गाव स्वच्छ व आकर्षक ठेवण्यासाठी अध्यक्ष संजय भोईर, उपाध्यक्ष हिमांशू पाटील, सचिव साहिल भोईर व अन्य सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
.................
घणसोली गावात स्वातंत्र्यसैनिक स्मारकाची मागणी
तुर्भे, बातमीदार : घणसोली गावाने स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मिठाच्या सत्याग्रहात गावातील अनेक तरुणांनी सहभाग घेतला होता. १९३० ते १९४२ दरम्यान या चळवळीतून ग्रामस्थांनी तुरुंगवास भोगला. डॉ. राजेंद्र प्रसाद, साने गुरुजी, कस्तुरबा गांधी यांसारखे नेते घणसोलीत आले होते. त्यामुळे या गावाला स्वातंत्र्यसैनिकांचे गाव, अशी ओळख मिळाली. आज गावात छोटेसे स्मारक असले तरी त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आगरी सेनेने घणसोली सेंट्रल पार्कमध्ये अद्ययावत व भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. हजारो नागरिक व पर्यटक या पार्कला भेट देतात. त्यामुळे स्मारक उभारले तर स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, असे आगरी सेनेचे शहरप्रमुख दिनेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
.........................
विघ्नहर्ता पुरस्कार सोहळा
नवी मुंबई वार्ताहर : नवी मुंबई पोलिस आयुक्तालय आयोजित विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळा पनवेलमधील फडके नाट्यगृहात पार पडला. परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे प्रमुख पाहुणे होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्कृष्ट मूर्ती, सामाजिक उपक्रम, शिस्तबद्ध मिरवणूक, देखावा अशा विभागात प्रथम व द्वितीय पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जय हनुमान सार्वजनिक मंडळ (रीडघर) व अनमोल जीवन असोसिएशन (उलवे) सर्वोत्कृष्ट ठरले. कार्यक्रमात बॅंडच्या गजरात मंडळांनी पुरस्कार स्वीकारले. परीक्षक मंडळासह विसर्जनास मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा गौरव झाला. मान्यवरांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
.................
नेरूळ स्थानकात भिकाऱ्यांचा उपद्रव
नेरूळ, बातमीदार : नेरूळ रेल्वेस्थानकात गेल्या काही दिवसांत भिकाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तिकीट खिडक्या, पादचारी पूल, प्लॅटफॉर्मवर महिला व लहान मुले भीक मागताना दिसून येत आहेत. काही जण प्रवाशांकडे हट्टाने पैसे मागतात. त्यामुळे नाराजी पसरली आहे. रात्री हे भिकारी स्थानकातच झोप काढतात. यामुळे परिसरात अस्वच्छता व असुरक्षिततेचे वातावरण आहे. नागरिकांनी रेल्वे प्रशासन व पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
...............
वाशीतील नाल्यात उडी टाकलेला युवक बेपत्ता
नवी मुंबई वार्ताहर : वाशी सेक्टर-२८ मधील नाल्यात सोमवारी दुपारी एका ३४ वर्षीय युवकाने उडी घेतली. निकोंज धिरज भानुशाली, असे त्याचे नाव असून, तो कोपरखैरणे सेक्टर-७ मधील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली, परंतु अद्याप तो सापडलेला नाही. मुसळधार पावसामुळे नाले दुथडी भरून वाहत असल्याने शोधकार्य अडचणीत आले आहे. पोलिसांनी युवकाचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT