वसई, ता. २० (बातमीदार) : वसई-विरार शहरातील प्रमुख मार्ग दुसऱ्या दिवशीही आज (ता. २०) पाण्याखाली आहेत. अनेक ठिकाणी पाणी ओसरले नसल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनादेखील वाट काढण्यासाठी कसरत करावी लागले, तर दुचाकी वाहने नादुरुस्त झाल्याने स्वारांचे चांगलेच हाल झाले. सखल भागात पाणी साचले असल्याने ते उपसून काढण्यासाठी रहिवाशांना पराकाष्ठा करावी लागली.
वसई तालुक्यातील नागरिकांना मंगळवारीही अतिवृष्टीचा सामना करावा लागला. वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसर पाण्यात बुडाल्याने अनेकांना मदतीसाठी प्रशासनाला धाव घ्यावी लागली. वसई पूर्वेकडील एव्हरशाईन, वसंतनगरी, भोईदापाडा, पश्चिम येथील माणिकपूर समतानगर, डिजी नगर, दिवाणमान, आनंदनगर मार्ग, विरार, तसेच गिरीज, सनसिटी रस्त्यावरील पाणी अद्याप ओसरले नाही. परिणामी वाहतूक ठप्प झाली असल्याचे दिसून येत आहे, तर अनेक भागांत पाण्यातून वाहने नेली जात असून प्रचंड कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यात सर्वाधिक दुचाकींचा समावेश असून पाण्यामुळे लहान वाहनांमध्ये बिघाड होत आहे.
अशातच मदतकार्यासाठी ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनेदेखील कोंडीत अडकत आहे. त्यांना पुढे जाण्यासाठी वर्दळ आडवी येत आहे. मंगळवारी पावसाने कहर केला होता, तर बुधवारी काही प्रमाणात विश्रांती घेतली. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडले होते, परंतु त्यांना कोंडी आणि जलमय रस्त्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक वाहने माघारी फिरल्याचे दिसून आले. वाहनांत बिघाड झाल्याने गॅरेजबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पाण्यामुळे साहित्याची हानी
इमारतीतील तळमजल्यांवरील घरांत पाणी शिरले. या पाण्याचा उपसा रहिवासी करत होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांनी सामान खरेदी केले होते. त्याच्यासह जीवनावश्यक साहित्य, फर्निचर व अन्य साहित्य खराब झाले. काही भागात गटाराचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी इमारतीत साचले आहे.
टॅक्टरमधून पोलिसांचा प्रवास
सर्वत्र पाणी साचल्याने कर्तव्यावर तैनात असणाऱ्या पोलिसांनी जे वाहन मिळेल, ते पकडून प्रवास सुरू केला होता. वसई पश्चिम येथे दोन कर्मचाऱ्यांनी टॅक्टरमधून प्रवास केल्याचे पहावयास मिळाले. आपत्ती काळात नागरिक सुखरूप राहावे, यासाठी ही धडपड पाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी कौतुक केले.
चालकांना भुर्दंड
रस्त्यावर गेल्या काही तासांपासून पाणी साचले आहे. वाहन घेऊन येताना बिघाड झाला. त्यामुळे गॅरेज गाठावे लागले. इंजिन प्लगमध्ये पाणी गेल्याने भुर्दंड सहन करावा लागला, असे वाहनचालक मयुर घुडे यांनी सांगितले.
पावसाळ्यात नादुरुस्त दुचाकी वाहनांचा खर्च (रुपयांत)
इंजिनमध्ये पाणी - २०० ते २५०
प्लग बदलणे - १०० ते १५०
ब्रेक निकामी - ५०
नवीन ब्रेक - १५०
फिल्टर बदलणे - १००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.