गणेशोत्स सहा दिवसांवर; ‘रो-रो’चा मात्र पत्ता नाही
यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खडतरच
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला असून, लाखो चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज आहेत; परंतु मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली रो-रो बोटसेवा अजूनही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे यंदाचाही प्रवास खडतर होणार असल्याची भीती चाकरमान्यांचा वाटत आहे.
काही महिन्यांपूर्वी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कोकणात जाणाऱ्यांसाठी रो-रो बोटसेवेची घोषणा केली. ही सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे त्यांनी सांगितले होते; मात्र बाप्पाचे आमगन सहा दिवसांवर येऊन ठेपले तरी यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रो-रो बोटीसाठी आवश्यक जेट्टी सिंधुदुर्ग येथे काही महिन्यांतच घाईघाईत सुरू करण्यात आली. मुसळधार पावसात कामगार आणि अभियंते दिवसरात्र काम करीत आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असले तरी घाईघाईने केलेल्या कामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
---
बोट वर्षभरापासून धूळखात
रो-रो बोट वर्षभरापासून डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलवर उभी आहे. परवानग्या न मिळाल्याने बोट धूळखात पडली आहे. त्यामुळे बोटीच्या देखभालीचा खर्च वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
----
अद्याप केंद्राची परवानगी नाही!
रो-रो सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून बैठकांवर बैठका घेत आहेत. मंत्र्यांच्या हट्टामुळे सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात केंद्राच्या नौकानयन महासंचालनालयाकडून सेवा सुरू करण्यासाठी अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांत मंजुरी मिळेल, असे सांगितले.
---
प्रवासी सुरक्षेला प्राधान्य
प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष करून लगेच परवानगी देणे शक्य नाही. खोल समुद्रमार्गातून धावणाऱ्या या बोटीला विशेषतः पावसाळ्यात मोठ्या लाटा, जोरदार वारे, दृश्यमानता इत्यादी धोके असतात. त्यामुळे काटेकोर सुरक्षा चाचण्या, स्थिरतेचे अहवाल, पर्यावरणविषयक मान्यता पूर्ण केल्याशिवाय सेवा सुरू होणार नसल्याचे डी. जी. शिपिंगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असल्याने रो-रो सेवा आवश्यकता होती; मात्र अद्याप नोंदणी, तिकीटदर, मार्ग कसा असेल, याबाबत स्पष्टता नाही. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होणार की नाही, यावर आता प्रश्नचिन्ह लागले आहे.
- अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती
---
मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण आहे. हे अपयश पचविण्यासाठी आणि कोकणवासीयांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकारने रो-रो बोटीची घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात ही फसवणूक आहे.
- रुपेश रामचंद्र दर्गे, सचिव, मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.