अडीच हजार कोटींचा पांढरा हत्ती!
वारंवार बिघाडामुळे प्रवाशांची मोनोरेलला नापसंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून चेंबूर-संत गाडगे महाराज चौकादरम्यान तब्बल २० किलोमीटर लांबीची मोनोरेल एमएमआरडीएने उभारली आहे. त्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी खर्ची घातले; मात्र सतत होणारे तांत्रिक बिघाड आणि सुमार सेवेमुळे दहा वर्षांनंतरही या मार्गावर दररोज केवळ १९-२० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मुसळधार पावसामुळे मंगळवारी (ता. १९) मुंबईकरांनी मोनोकडे मोर्चा वळवला, तर ओव्हरलोड होऊन ती बंद पडल्याने प्रवाशांची मोठी लटकंती झाली. त्यामुळे देशातील मोनोरेलचा पहिला प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे.
मुंबईकरांना गारेगार आणि वेगवान प्रवास करता यावा, म्हणून राज्य सरकारने २०१० पूर्वी मोनोरेल प्रकल्प हाती घेतला. वडाळा-चेंबूर हा टप्पा फेब्रुवारी २०१४ मध्ये, तर चेंबूर-संत गाडगे महाराज चौक हा संपूर्ण मार्ग मार्च २०१९ मध्ये सेवेत आला. सहा गाड्यांच्या माध्यमातून दर पंधरा मिनिटांनी दररोज १४२ फेऱ्या चालवल्या जातात; मात्र सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड, आग लागणे, तांत्रिक दुरुस्तीसाठी पार्ट उपलब्ध न होणे, दोन फेऱ्यांमधील जादा वेळेमुळे मोनोरेलकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली. पावसामुळे लोकल सेवा ठप्प पडल्याने मुंबईकरांनी दक्षिण मुंबईतून चेंबूरपर्यंत पोहोचण्यासाठी मोनोरेलकडे धाव घेतली; पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने मंगळवारी ती अडखळली. अग्निशमन दलाच्या मदतीने ५८२ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
---
केवळ पाच गाड्यांची धावाधाव
मोनोरेलच्या ताफ्यात सध्या सहा गाड्या आहेत. त्यापैकी तांत्रिक बिघाडामुळे एक गाडी बंद पडल्याने केवळ पाच गाड्यांंचीच धावधाव सुरू होती. त्यामुळे एरवी १५-२० मिनिटांनी धावणारी मोनो बुधवारी (ता. २०) ३५-४० मिनिटांनी धावत होती, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
---
बिघाडातील सातत्य
सप्टेंबर २०१९ - म्हैसूर काॅलनीनजीक तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलचा खोळंबा
नोव्हेंबर २०१७ - म्हैसूर काॅलनी स्थानकात मोनोरेलला लागलेल्या आगीत दोन डबे जळून खाक
ऑगस्ट २०१६ - चेंबूर स्थानकात मोनोरेलच्या डब्याला आग
मार्च २०१५ - वीजपुरवठा खंडित झाल्याने भक्ती पार्क स्थानकापासून काही अंतरावर मोनोरेल अडकली
---
आकडे बोलतात...
एकूण अंतर - २० किलोमीटर
एकूण गाड्या - ६
प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता - ५६८
एकूण खर्च - २,४६० कोटी
----
एमएमआरडीएने मोनोरेलचा कारभार सुधारावा किंवा कायमची बंद करावी. नागरिकांसाठीची असलेली ही सेवा पूर्ण क्षमतेने चालायला हवी. त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळेचे मोनोरेलच्या प्रवशांना फायदा कमी आणि गैरसोय जास्त होते.
- ॲड. गाॅडफ्रे पिमेंटा, वाहतूक तज्ज्ञ
---
‘मोनो’च्या अतिरिक्त प्रवाशांवर नियंत्रण
मोनोरेलमधील अतिरिक्त प्रवाशांमुळे ती बंद पडून झालेली गैरसोय टाळण्यासाठी आता एमएमआरडीए सतर्क झाले आहे. त्यामुळे मोनोरेलच्या अतिरिक्त प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, गाड्यांना असलेल्या आपत्कालीन खिडक्यांची तपासणी आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी आज एममएमआरडीए आणि एमएमएमओसीएलची बैठक झाली. त्यामध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या अंशकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.