पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. २० : शहराला पाणीपुरवठा करणारा महापालिकेचा एकमेव वऱ्हाळादेवी तलाव आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तो काठोकाठ भरला आहे. त्यामधील पाणी ओसंडून वाहत असून नियोजनाअभावी दररोज या तलावातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. काही वर्षांपासून महापालिका इतर मार्गाने शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी विकत घेत आहे. महापालिकेने आधीच नियोजन केले असते, तर वाया जाणारे पाणी साठवून नागरिकांना पिण्यासाठी वापरू शकले असते.
भिवंडीतील कामतघर परिसरात महापालिकेचा सुमारे ५७ एकरचा वऱ्हाळादेवी तलाव आहे. त्यापैकी सध्या ५४ एकर जागेत तलावामध्ये पावसाचे पाणी साचते. या तलावात पाणी साचण्याची क्षमता ६२८५ मिलिलिटर असून पावसाळ्यात तो पूर्णपणे भरला आहे. सध्या त्यातून पावसाचे पाणी ओसंडून वाहत आहे. भिवंडी नगरपालिका असताना शहराची लोकसंख्या कमी होती. त्यामुळे विस्तृत अशा तलावाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरत होते. सध्या भिवंडी महापालिका झाली असून शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावात अतिक्रमण झाले. परिणामी, पाणी साठण्याची क्षमता कमी झाली. ३० वर्षांपूर्वी शहराला दररोज २५ एमएलटीपेक्षा जास्त पाणीपुरवठा करणारा तलाव सध्या प्रति दिन ३ ते ५ एमएलटी पाणी शहरातील नागरिकांसाठी पुरवत आहे. त्यामुळे पालिका स्टेमकडून ७३ एमएलटी आणि मुंबई महापालिकेकडून ४२ एमएलटी पाणी विकत घेत आहे. त्यामध्येही पाणी चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे पथकाच्या कारवाईनंतर दिसून येते.
क्षमता वाढवण्यासाठी नियोजन आवश्यक
भिवंडीत सध्या मोठ्या संख्येने विकासकामे होत असल्याने बहुमजली इमारतींची कामे सुरू आहेत. अशा स्थितीत पाणी साठविण्याचे आणि पुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने करणे आवश्यक आहे. पाच वर्षांपासून नागरिकांकडून वऱ्हाळा तलावातील अनावश्यक अतिक्रमणे दूर करून तलावाची खोली वाढवावी. तलावातील प्रदूषण नष्ट करावे. तलावाची पाण्याची क्षमताही वाढविण्याची मागणी केली जात आहे. ही क्षमता वाढविल्यास किमान शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येईल.
भिवंडी महापालिकेच्या वऱ्हाळा तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढविणे आणि सुशोभीकरणासाठी निधीची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रयोजन देऊन निधीची मागणी केली आहे. निधी आल्यावर काम करून तलावात पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.
- संदीप पटणावर, प्रभारी कार्यकारी अभियंता
भिवंडी महापालिका
भिवंडी : वऱ्हाळादेवी तलाव ओसंडून वाहत आहे.