साबरमतीच्या धर्तीवर उल्हास नदीकाठचा विकास
बदलापूरमधील पूरस्थिती येणार नियंत्रणात; जलसंपदा विभाग सकारात्मक
बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गुजरातमधील साबरमती वॉटर फ्रंटसारखा प्रकल्प उल्हास नदीवर राबविण्यात यावा, यासंदर्भात जनसंपदा विभागाने सकारात्मकता दर्शवली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला, तर वर्षानुवर्षांची समस्या असलेल्या पूरस्थितीतून बदलापूरकरांची कायमची सुटका होणार आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची यासंदर्भात बैठक बुधवारी (ता. २०) पार पडली.
ऑगस्ट २००६ मध्ये गुजरातमधील साबरमती नदीला महापूर आला होता. या महापुरात नदीकाठच्या शेकडो झोपड्या वाहून गेल्या. त्या वेळी मोठी जीवित व वित्तहानी झाली. या परिस्थितीनंतर गुजरात प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एसआरएफडीसीएल) या कंपनीच्या माध्यमातून २००८ पासून, साबरमती नदीच्या पूरस्थितीला आळा घालण्याचे काम सुरू झाले. या ठिकाणी उंच आणि मजबूत अशी संरक्षक भिंत उभारली आहे. तसेच नदीच्या काठाचा विकास करून या ठिकाणी पर्यटनस्थळ तयार केले आहे. याच धर्तीवर बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचेदेखील संवर्धन आणि नदीकाठचा विकास होणे गरजेचे आहे. नदीतील गाळ उपसा करणे, नदीकाठावर उंच आणि मजबूत अशी संरक्षक भिंत उभारणे, साबरमती वॉटर रिव्हर फ्रंटसारखा प्रकल्प उभारणे, याबाबत जलसंपदा विभागाने सकारात्मकता दर्शवली आहे. बुधवारी (ता. २०) रोजी यासंदर्भात जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासोबत शहराचे माजी नगराध्यक्ष राम पातकर त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला राम पातकर यांच्यासोबत समाजसेवक संजय भोईर व संतोष जाधव हेदेखील उपस्थित होते.
गुजरातमधील साबरमती नदीवर दोन्ही काठांवर बांधलेल्या भिंतींमुळे किनाऱ्यांची धूप कमी होऊन आणि शहराच्या सखल भागात पूर येण्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण सुधारले आहे. नवीन एकात्मिक सांडपाणी प्रक्रियादेखील या ठिकाणी राबविण्यात आली आहे. त्यामुळे उल्हास नदीवरदेखील या धर्तीवर प्रकल्प राबविण्यात आला तर, ठाणे जिल्ह्यातील ही उल्हास नदी भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
नगरविकास खात्याकडे शिफारस
१) आंतरराष्ट्रीय पातळीवर नदी परिसरातील सखल भागात पुराचे पाणी साचून राहू नये, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखा भूगर्भातील जलसाठा तयार करण्यात येतो याला बोअर्स म्हटले जाते. त्याच धर्तीवर उल्हास नदीतील गाळ तातडीने काढण्यासंदर्भात व नदीच्या कडेलादेखील बोअर्स करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ यांचा सल्ला घेऊन हे बोअर्स टाकण्यात येतील, याबाबत चर्चा झाली.
२) उल्हास नदीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रस्ताव मंजूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
३) नदी संवर्धनाचे काम हाती घेण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि जलसंपदा अधिकारी तसेच भूगर्भ शास्त्रज्ञ यांची तातडीने बैठक लावण्यात येईल.
४) नदीपात्राजवळील जागेत शासनाची परवानगी घेतलेल्या पुनर्विकासासाठी उत्सुक इमारतींना नियमाप्रमाणे योग्य टीडीआर मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडे शिफारस करण्याचे मान्य केले आहे.
५) गुजरातमधील साबरमती वॉटर फ्रंटसारखा प्रकल्प उल्हास नदीवर राबवण्यासाठी सल्लागार नेमण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागांनी दिली.
उल्हास नदीवर येणारा पूरस्थितीमुळे बदलापूरकरांचे जनजीवन ठप्प होऊन जाते. शहराचा विकास खुंटतो, त्यामुळे गेली अनेक वर्षे जाणवत असलेल्या समस्येतून शहराला बाहेर काढण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पत्रव्यवहारदेखील केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या संचालकांसोबत ही बैठक पार पडली. अभ्यासपूर्ण आणि संपूर्ण परिस्थितीचा भौगोलिक आढावा घेऊनच हे मुद्दे मांडण्यात आले. त्यामुळे हे सगळे मुद्दे वास्तविकदृष्ट्या राबवण्यासाठी सरकार दरबारी सतत पाठपुरावा करत राहणार आहे.
-राम पातकर, माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.