जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना
मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र
सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २१ ः केंद्र आणि राज्य सरकारकडून आदिवासी विकासाच्या मोठ्या योजना आणि घोषणा केल्या जात आहेत; मात्र पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाड्यातील आदिवासींना जगणे आणि मरणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. सरकारच्या रोजगार हमी योजनेत काम करूनही श्रमाचा मोबदला वेळेत मिळत नाही. मरणानंतर मोक्ष मिळावा म्हणून सुस्थितीत स्मशानभूमीदेखील नाही. मुसळधार पावसात ताडपत्री तर पत्र्याचे आच्छादन करून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे भीषण वास्तव कुर्लोदच्या घटनेनंतर नाशेरा ग्रामपंचायतीमधील ठवळपाडा येथे समोर आले आहे.
आदिवासी भागात स्थानिक ठिकाणी शाश्वत रोजगार मिळावा म्हणून रोजगार हमी योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत १५ दिवसांत मागेल त्याला काम आणि काम केल्यानंतर मजुरीचे दाम असे धोरण आखले; मात्र मोखाड्यासह जिल्ह्यातील आदिवासींना रोजगार हमीच्या कामाचे दाम, या धोरणानुसार कधीच मिळाले नाही. त्यांना मजुरीसाठी सहा महिने ते वर्षभर वाट पाहावी लागते आहे. त्यामुळे त्यांनी शहराकडे रोजगारासाठी स्थलांतराचा मार्ग अवलंबला आहे. तेथे ही वीटभट्टी, दगडखाण आणि ऊसतोड करण्यासाठी गेल्यावर वेठबिगाराचे जीवन हलाखीत जगावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
गावात प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. स्मशानभूमी नसल्याने भरपावसात उघड्यावर, कधी प्लॅस्टिकची ताडपत्री तर पत्र्याचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करून यातना भोगत मोक्ष मिळवावा लागतो आहे. २५ जुलैला कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत उघड्यावर ताडपत्री खाली सरण रचून मुसळधार पावसात एका महिलेवर अंत्यसंस्कार करावे लागले. त्यानंतर धामणशेत कोशीमशेत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनाही स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे मरणानंतर यातना भोगाव्या लागत आहेत. त्यापाठोपाठ नाशेरा ग्रामपंचायत हद्दीतील ठवळपाड्यात बुधवारी (ता. २०) सोमी गंगा ढोले (वय ८५) या वयोवृद्ध महिलेवर पावसात उघड्यावर पत्र्याखाली सरण रचून अंत्यसंस्कार करावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांतील स्मशानभूमींची दुरवस्था झाली असल्याने तेथेही मरणानंतर असाच संघर्ष करावा लागतो आहे.
ठवळपाडा गावात गेल्या पाच वर्षांपासून स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. अनेकदा मागणी करूनही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, चार महिन्यांत येथे सहा मृतदेहांवर मुसळधार पावसात उघड्यावरच पत्र्याखाली अंत्यविधी करावे लागले आहेत. त्यामुळे जगण्यासाठी छळ आणि मरणानंतर यातना भोगाव्या लागत असल्याची भीषण स्थिती आदिवासींवर ओढवली आहे.
प्रकल्प मोठे; पण वैद्यकीय सुविधा नाही
पालघर आदिवासी जिल्हा निर्माण झाल्यानंतर येथे सक्षम वैद्यकीय सुविधा अजूनही झालेली नाही; मात्र बुलेट ट्रेन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाढवण बंदर, रिलायन्सचा प्रोजेक्ट, समृद्ध महामार्ग ते वाढवण बंदर मार्गाला मंजुरी यांसारखे मोठे प्रकल्प आणण्याचा घाट सरकारने घातला आहे; मात्र येथील आदिवासींना जगायला नाही तर मरायला व्यवस्थित मिळत नाही, हे दुर्दैव आहे.
गेल्या चार वर्षांपासून आम्ही स्मशानभूमी बांधण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करतो आहे; मात्र त्याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. मृतदेहावर पावसात उघड्यावर पत्र्याखाली सरण रचून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गेल्या चार महिन्यांत सहा मृतदेहांवर असेच अंत्यसंस्कार केले आहेत. मरणानंतरही आदिवासींची हालअपेष्टा थांबत नाही, हेच आमचे दुर्दैव आहे.
- शंकर हाडोंगा, माजी उपसरपंच, नाशेरा ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.