स्टडी टेबलमध्ये सोन्याचे दागिने ठेवणे पडले महागात
घरफोडीत पावणेआठ लाखांचा ऐवज चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : खासगी बांधकाम ठेकेदाराच्या बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी स्टडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख ९० हजार असा पावणेआठ लाखांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. ही घटना मंगळवार (ता. १९) रोजी घडली असून, याप्रकरणी बुधवार (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शास्त्रीनगर येथे राहणारे प्रकाश राठोड (३५) यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांचे दोन मजली घर आहे. वरच्या मजल्यावर असलेल्या स्टडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी, मुलींचे सोने -चांदीच्या दागिन्यांसह पैसे ठेवले होते. त्यांची आई गावी आणि त्यांची पत्नी व मुले हे मुंबईत भावाकडे गेले होते. त्यामुळे ते एकटेच घरी होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते कामाला गेले असता रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लोखंडी गेट उघडे दिसून आले. तसेच घराच्या दरवाजाची कडी व कुलूप तुटले होते. स्टडी टेबलमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, चेन, लॉकेट, कानातले, अंगठी असे चार लाख सात हजार सोन्याचे दागिने तसेच दोन लाखांची २०० ग्रॅम वजनाची चांदीची चेन आणि रोख ९० हजार असा एकूण सात लाख ६० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.