पिंपळास रेल्वे पुलानजीक रस्त्याखालील माती खचली
भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी
भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी बायपास रस्त्यावरील पिंपळास येथील रेल्वे पुलानजीक रस्त्याखालील माती खचल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वसई-दिवा रेल्वे मार्गिकेसाठी बायपास रस्त्यावर पूल उभारलेला आहे. आठ पदरी रस्ता करण्यासाठी येथे वाढीव पूल बनविण्याचे काम सुरू असताना रात्रीपासून पुलानजीक रस्त्याखालील सुमारे पाच मीटर माती खचण्यास सुरुवात झाली.
ही बाब निदर्शनात येताच वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शरद ओव्हाळ व किनगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड लावून येथील रस्ता बंद करीत एकेरी वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक, प्रवासी यांना करावा लागत आहे. पिंपळास रेल्वे पूल ते थेट येवई नाका दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरदेखील वाहतूक कोंडी सुरू झाली आहे.
दरम्यान, आठ पदरी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून खालील बाजूस मातीचा भराव केल्यानंतर येथील बॅरिकेड्स बाजूला करत कोनगाव वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक सुरळीत केली, परंतु या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे भिवंडी ते ठाणे या १५ किमी अंतराच्या प्रवासासाठी सुमारे तीन तास लागत असल्याने प्रवासी वाहनचालक त्रस्त आहेत