मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

CD

पोलिस आयुक्तालयातर्फे ‘विघ्नहर्ता’ पुरस्कार उत्साहात
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस उप आयुक्त प्रशांत मोहिते (परिमंडळ ३) होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले, विक्रम कदम, तसेच वपोनि नितीन ठाकरे, गजानन घाडगे, जयंत पगडे, अजय बहिरा यांसह पनवेल महापालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध गटांमध्ये विजेते ठरलेल्या मंडळांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट गणेशमूर्ती गटात प्रथम क्रमांक श्री गणेश उत्सव मंडळ (उरण) तर द्वितीय क्रमांक श्री गणेश मित्र मंडळ (कामोठे) यांनी पटकावला. सामाजिक उपक्रम गटात प्रथम क्रमांक शंभो मित्र मंडळ (कामोठे) तर द्वितीय क्रमांक गणेश मित्र मंडळ (खारघर) यांनी मिळवला. शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक गटात जय दुर्गा क्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळ (तळोजा) आणि अभिनव युवक मित्र मंडळ (पनवेल) यांनी अनुक्रमे पहिला-दुसरा क्रमांक मिळवला. तसेच उत्कृष्ट देखावा गटात राजे शिवाजीनगर रहिवाशी मंडळ (कळंबोली) आणि एकविरा मित्र मंडळ (पनवेल) तर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ गटात जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रिटघर) आणि अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशन (उलवे) यांचा सन्मान झाला.
..........................
नेरूळ येथे श्वान विष्ठेमुळे नागरिक हैराण
जुईनगर (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने श्वान मल सफाईबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ठिकठिकाणी फलक लावून श्वान मालकांना सार्वजनिक ठिकाणी मल त्वरित साफ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र महापालिका कायदा १९४९ नुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही नेरूळ सेक्टर १० आणि १२ येथील पदपथांवर मोठ्या प्रमाणात श्वान मल आढळून येत आहे. शिवदर्शन सोसायटी ते पारसिक बँक या मार्गावरील पदपथांवर दररोज मल साचलेले दिसते. सकाळी आणि संध्याकाळी श्वान मालक श्वानांना मल विसर्जनासाठी येथे आणतात, असे नागरिकांनी सांगितले. या पदपथाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, कारण येथे बस डेपो, शाळा, महाविद्यालय, बँका आणि उद्याने आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना या अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने राबविलेल्या मोहिमेचे नागरिक स्वागत करत आहेत, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. नागरिकांनी तातडीने तपासणी करून नियमभंग करणाऱ्या श्वान मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नागरिक मोठ्या प्रमाणावर आवाज उठवतील, असा इशारा दिला आहे.
..................
विष्णूदास भावे नाट्यगृहात धम्मप्रवचन
वाशी (बातमीदार) : त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक दिवंगत उर्गेन संघरक्षित यांचा शंभरावा जन्मदिन २६ ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईत या कार्यक्रमांचे केंद्रबिंदू विष्णूदास भावे नाट्यगृह आहे. या दिवशी संध्याकाळी ५ वाजता अश्वघोष सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता धम्मप्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. उर्गेन संघरक्षित यांनी बौद्ध धम्माला आधुनिक दृष्टिकोन देऊन पाश्चिमात्य आणि भारतीय परंपरेचा दुवा जोडला. लंडन येथे १९६८ मध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना झाली. भारतात १९७९ पासून या संघटनेचे कार्य सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीला बळकटी देण्याचे काम महासंघाने केले आहे. मुंबई विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धम्मचारी लोकमित्र मुख्य प्रवचन देतील. तसेच धम्मचारी चंद्रबोधी, बोधीसेन व अनोमदस्सी यांना चळवळीतल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येईल. आयोजकांनी बौद्ध बांधवांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या व्यतिरिक्त, राज्यभरात उर्गेन संघरक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
.................
सानपाड्यात स्मार्ट मीटर विरोधात मोहीम
जुईनगर (बातमीदार) : सानपाडा परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी महावितरणकडे लेखी नकार अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे. सानपाडा अखिल महासंघाच्या ग्रुपद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवता येत नाहीत. तरीही कंत्राटदारांकडून सक्तीने मीटर बसवले जात आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. नुकतेच शिरवणे ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. त्याच धर्तीवर आता नवी मुंबईभर ही चळवळ पसरत आहे. अर्जात नमूद करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटर बसवण्याचे खर्च ग्राहकांकडून वसूल केले जातील. यामुळे दरवाढ होऊन अंदाजे ३० पैसे प्रति युनिट वाढ होऊ शकते. भविष्यात हे मीटर दहा हजार रुपये पेक्षा अधिक किमतीचे असतील, असा दावा करण्यात आला आहे. नागरिकांनी या प्रक्रियेला विरोध दर्शवून साध्या मीटरची मागणी केली आहे. सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास प्रखर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
.................
गावठाण जमीन हक्कासाठी नेरूळमध्ये ग्रामसभा
तुर्भे (बातमीदार) : नवी मुंबईतील गावठाण घरे अनधिकृत ठरवून निष्कासित करण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भूमिपुत्रांमध्ये संताप उसळला आहे. या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यासाठी नेरूळ गावात बुधवारी ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला प्रकल्पग्रस्त नेते व प्रसिद्ध वक्ते राजाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सिडकोने गेल्या ५० वर्षांत शहर विकासावर भर दिला, मात्र गावठाणांचा सकारात्मक विचार केला नाही. योग्य वेळी सीमांकन झाले असते तर अनधिकृततेचा प्रश्नच निर्माण झाला नसता. गावठाणांवर बुलडोझर फिरवून ती जमीन क्लस्टर प्रकल्पांतर्गत बिल्डरांना देण्याचा डाव सुरू आहे, असा आरोप त्‍यांनी यावेळी केला आहे. या बैठकीत तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले, मूळ व विस्तारित गावठाणाचा सिटी सर्व्हे लोकवर्गणीतून करणे, गावठाण जमीन हक्क समिती स्थापन करणे, नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्याविरोधात हरकती नोंदवणे. यावेळी अनंत म्हात्रे, राहुल म्हात्रे, विधिज्ञ निरंत पाटील, गणेश भोपी, मनोज ठाकूर आदी उपस्थित होते. या आंदोलनामुळे नवी मुंबईत मोठे राजकीय व सामाजिक आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
...............
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत भाजपकडून निवेदन
खारघर (बातमीदार) : खारघरमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या समस्येमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. त्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरणार असल्याने भाजप शिष्टमंडळाने गुरुवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये यांची भेट घेऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. शिष्टमंडळाच्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते. परंतु पहिल्याच पावसात डांबर वाहून गेले असून रस्त्यावर खडी साचल्याने वाहने घसरून किरकोळ अपघात वाढले आहेत. धुळीमुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. डांबरीकरणाला एवढी कमी मुदत का मिळते? असा सवाल शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना विचारला. तर अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, डांबरीकरण केलेल्या कंपनीला अद्याप कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत. काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे. या भेटीत प्रवीण पाटील (मंडल अध्यक्ष), ब्रिजेश पटेल (जिल्हा), साधना पवार (महिला मोर्चा), नितेश पाटील (युवा मोर्चा), दीपक शिंदे (सरचिटणीस), अभिमन्यु पाटील (माजी नगरसेवक), ॲड. नरेश ठाकुर यांसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT