भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने भात, नागली आणि भाजीपाल्यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतात उभी पिके वाहून गेली तर अनेक शेतकऱ्यांचे पशुधनही पावसाच्या प्रवाहात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर तातडीने ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात मुख्यतः भातपिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, तर आदिवासीपट्ट्यात नागली आणि इतर पिके घेतली जातात. अतिवृष्टीमुळे या सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे, असे चोरघे यांनी निवेदनात नमूद केले आहे. राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी, कठीण काळात नियम व अटींच्या चौकटीत न अडकता थेट शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी ठाम मागणी चोरघे यांनी केली आहे.