वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा करून समाजात आदर्श निर्माण करावा, असा सल्ला गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी दिला आहे. गणेशोत्सवात कुठलाही आक्षेपार्ह देखावा सादर न करता धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २१) झालेल्या शांतता कमिटी बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. बच्छाव यांनी पुढे सांगितले, मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, मिरवणुकीच्या वेळेत वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. वर्गणी जबरदस्तीने उकळल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होईल. गणपती मंडप वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज जोड अधिकृत वीज कंपनीकडूनच घ्यावी. रस्त्यावर मनोरंजन खेळ किंवा स्पर्धा आयोजित करू नयेत. शक्यतो शाडूच्या मूर्तींचा वापर करावा, प्लॅस्टिकचा वापर टाळावा, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करावे.
सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणपती ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, २४ तास स्वयंसेवक उपस्थित ठेवावेत. स्थापना व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. गणेशमूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
या वेळी पोलिस नाईक किरण डुकले, पोलिस उपनिरीक्षक शेवाळे, गिरासे, पोलिस हवालदार शेंडे, महिला दक्षता समितीच्या सदस्या, ग्रामस्थ व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.