ठाण्यात लवकरच पॉड टॅक्सी
सहा किमीसाठी प्रति माणसी ३० रुपये
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ठाण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी लवकरच शहरात पॉड टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प किफायतशीर ठरेल, कारण सहा किमीच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती फक्त ३० रुपये मोजावे लागतील. रिक्षापेक्षाही हे भाडे कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पहिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (ता. २१) ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये घोडबंदरसह शहरातील वाहतूक समस्या आणि इतर विषयांवर संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या उपाययोजनांचा ऊहापोह करताना पॉड टॅक्सीच्या पुढील वाटचालीचे सादरीकरणही करण्यात आले. आर्थिक व्यवहार्यता तपासून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
* लांबी आणि स्थानके : हा पॉड टॅक्सी मार्ग सुमारे ५२ किमी लांबीचा असेल आणि त्यात अंदाजे ६३ स्थानके असतील.
* वेग आणि क्षमता : या टॅक्सीचा वेग ताशी ६० किमी असेल. एका वेळी त्यात १६ प्रवासी बसू शकतील.
* ऊर्जेचा स्रोत : ही टॅक्सी पूर्णपणे विजेवर चालणार आहे.
* पहिला टप्पा : भाईंदर पाडा ते कापूरबावडी या मार्गावर ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
मोनोसारखी अवस्था नको
हा प्रकल्प सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवला जाईल; मात्र हा प्रकल्प सुरक्षित आणि यशस्वी होईल, याची खात्री करण्यासाठी योग्य आराखडा तयार करण्याची सूचना प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच मोनोरेलसारखी अवस्था होऊ नये, यासाठी त्याची व्यवहार्यता तपासणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकल्प यशस्वीतेसाठी गाईड लाइन आवश्यक : सौरभ राव
पालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून, केंद्राकडून मान्यता मिळवण्याची आणि प्रकल्पाची सुरक्षितता तपासण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पीपीपी तत्त्वावरील या प्रकल्पाला आमचा विरोध नसून केंद्राकडून या प्रकल्पाला मान्यता घ्यावी लागणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) पालिकेकडे सादर झाल्यावर तो पुढील मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.