उरण-नेरूळ रेल्वेस्थानकादरम्यान फेऱ्या वाढणार
आमदार महेश बालदी यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः उरण-नेरूळ रेल्वेस्थानकादरम्यान लवकरच फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या ४० फेऱ्यांऐवजी ५० फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने लवकरात लवकरच अंमलबजावणी होणार असल्याने उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर व सोईस्कर होणार आहे. या बैठकीत केवळ रेल्वेमार्ग, फेऱ्या वाढविण्याबाबतच नव्हे, तर प्रवाशांना भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. स्थानकावरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत मांडणी करून त्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत. उरण-नेरूळ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नेहमीप्रमाणेच आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळणार असून, रेल्वेसेवेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे, असे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
......................
पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’
रामशेठ ठाकूर यांचे अमृतमहोत्सवी वर्ष; सर्वोत्कृष्ट मंडळाला ५१ हजार रुपये बक्षीस
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. शहरातील मार्केट यार्डमधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
ही स्पर्धा ‘पुरुष खुला गट’ आणि ‘महिला खुला गट’ अशा दोन गटांत होणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक सात हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी सात हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह असे आहे. शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस आयोजित या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा २४ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या स्पर्धेचा भजनप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर व आयोजन समितीने केले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पंडित शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील, ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, शंकुनाथबुवा पडघेकर, महादेवबुवा शहाबाजकर, सारेगम फेम जितेंद्र तुपे, इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.