मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूंना मुदतवाढ
मुंबई, ता. २१ : रिद्धपूर येथील राज्याच्या पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या नियुक्तीचा कालावधी हा पुढील महिन्यात ४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार होता, मात्र पुढील नियुक्ती आणि त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने त्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. यासाठीचा शासन निर्णय आज (ता. २१) रोजी विभागाने जारी केला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अमरावती जिल्ह्यात मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर या विद्यापीठाची स्थापना केली. मागील तीन वर्षांत काही प्रशासकीय कार्यालये, काही मोजकेच अभ्यासक्रम वगळता विद्यापीठ विकासाचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही रखडले आहेत. कुलगुरू डॉ. आवलगावर यांच्या प्रयत्नामुळे विद्यापीठातील संशोधन प्रकल्प मार्गी लागले आहेत, मात्र विविध प्रकारचे अभ्यासक्रम, शाखा, संशोधनासाठी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या साहित्याचा मोठा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. आवलगावकर यांना मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यापीठाची विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.