सामान्य माणसाला युद्धाचे महत्त्व नाही
ब्रिगेडियर संग्राम दळवी यांनी व्यक्त केली खंत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : आपल्याला योग्य इतिहास शिकवलाच गेला नाही. त्यामुळे युध्दाचे महत्त्व सामान्य माणूस जाणतच नाही. आजच्या पिढीला तर तो माहितच नाही अशी खंत ब्रिगेडियर संग्राम दळवी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक, सगळी साम्राज्यं, शिवकाल, पेशवेकाळ, ब्रिटिशकाळाचा इतिहास सांगितला.
प्रसिद्ध लेखिका नयना वैद्य यांच्या "कुरुक्षेत्र ते कारगिल" ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन रविवारी(ता. १७) खारकर आळी ठाणे येथील समारोह बॅंक्वीट हॉलमध्ये करण्यात आले होते. कर्नल मेघन देशपांडे, वीरमाता अनुराधा गोरे, प्रकाशक आणि अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते आदी उपस्थित होते. त्यानंतर कर्नल देशपांडे यांनी आपल्या भाषणातून ते पूर्वी कार्यरत असलेल्या सियाचल ग्लेशियर्सवर शत्रूशी मुकाबला करतांनाचे चित्तथरारक अनुभव सांगितले. उणे ८० तापमान असलेल्या ठिकाणी झूंज देण्यासाठी रोमरोमात देशप्रेम असणंच आवश्यक आहे याची प्रचिती ऐकतांना आली. त्या भागातील माहिती आणि आपल्या दलातील सैनिकांनी खडतर परिस्थितीवर कशी मात केली हे कर्नल यांनी सांगितले. लेखिका वैद्य यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, भारतीय वायुदलाचे कारगील युध्दातील प्रमुख एअर चीफ मार्शल अनील टिपणीस यांनी वैद्य यांना पत्राद्वारे पाठवण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. गोरे म्हणाल्या की, युध्दकथा ह्या वाचकांच्या/ श्रोत्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या असतात. पण सामान्य नागरिक हा याबाबत उदासीन असतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही उदासिनता आपल्या राष्ट्राला महागात पडू शकते असं त्या म्हणाल्या. निवेदिका अरुणा कर्णिक यांनी सूत्रसंचालन केले.