भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : तालुक्यातील भिवंडी–वाडा तसेच अंजूरफाटा–खारबाव–चिंचोटी महामार्गाची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेकडून २५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान ‘भीक मांगो’ आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली आहे.
भिवंडी–वाडा आणि अंजूरफाटा–खारबाव–चिंचोटी मार्गांच्या दुरुस्तीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली यापूर्वी २६ जूनला नऊ ठिकाणी सलग १२ तासांपेक्षा अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन झाले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ठेकेदारांनी केवळ आठवडाभर थातूरमातूर काम दाखवून सरकारकडे निधी नसल्याचे कारण देत काम बंद केले. त्यामुळे आज रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गर्भवती माता, वयोवृद्ध, विद्यार्थी, रुग्णवाहिका व इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांची मालिका सुरू असून अनेक वाहने रस्त्यात बंद पडत असल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे.
या मार्गांचा वापर हजारो नागरिक, विद्यार्थी दैनंदिन प्रवासासाठी करतात. तसेच, शेतमाल व औद्योगिक माल वाहतुकीसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशमूर्ती ने-आण करताना अनेकांचे जीव टांगणीला लागले आहेत. सरकारकडे पैसे नसल्याचे कारण देत रस्त्यांची दुरुस्ती टाळली जात आहे.
मंडपाची उभारणी
वाडा तालुक्यातील कुडूस, भिवंडी तालुक्यातील अंबाडी; तसेच वसई तालुक्यातील कामण येथील रस्त्यांवर मंडप उभारून कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ‘भीक मांगो’ आंदोलन करणार असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले आहे. तसे निवेदन भोईर यांच्यासह सरचिटणीस विजय जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्या वतीने देण्यात आले आहे.