अंबरनाथमध्ये दुचाकीला आग
अंबरनाथ, ता. २१ (वार्ताहर) : येथील पूर्वेकडील निसर्ग ग्रीन गृहसंकुलाजवळ गुरुवारी (ता. २१) सकाळी एका झोमॅटो कर्मचाऱ्याच्या धावत्या दुचाकीला अचानक आग लागण्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
किरण बाळाराम सरोदे (३५) हा झोमॅटो कर्मचारी गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आपली दुचाकी घेऊन कॅबिन रोडने जात होता. निसर्ग ग्रीन गृहसंकुलाजवळ पोहोचल्यावर त्याच्या दुचाकीतून अचानक ठिणग्या बाहेर पडू लागल्या. हा प्रकार लक्षात येताच त्याने तत्काळ दुचाकी रस्त्यावर सोडून दिली. काही क्षणातच दुचाकीने पेट घेतला. हे पाहताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. किरण सरोदे याने या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली असून, पुढील तपास सुरू आहे.