वसई, ता. २५ (बातमीदार) : गेल्या आठवड्यात आलेल्या अतिवृष्टीची झळ वसई तालुक्याला बसली. सखल परिसरातील घरे, औद्योगिक वसाहतीत पाणी शिरले होते. आता पाणी ओसरले असून, दैनंदिन वापराच्या घरगुती वस्तू, दुकानांतील साहित्य वाचविण्यासाठी नागरिक धडपड करीत होते. चाळींमधील घरांच्या भिंती ओल्या झाल्या असून, विद्युत उपकरणात बिघाड झाला. सणासुदीच्या तोंडावर सामानाची नासधूस झाल्याने घरातील पाणी काढताना रहिवाशांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. त्यामुळे अनेकांनी अतिवृष्टीतून सावरण्यासाठी थेट विघ्नहर्त्याला साकडे घातले आहे.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या भागांत अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. सखल भागात असणाऱ्या इमारतींमध्ये तळमजल्यावर तसेच चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात दीड ते दोन फूट पाणी आले होते. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पाणी बाहेर काढण्यासह फर्निचर, विजेचे उपकरणे यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची हानी होऊ नये, म्हणून काळोखात साफसफाईसाठी धडपड सुरू झाली आहे. घरातील सदस्य पावसाचे पाणी काढण्यात व्यग्र आहेत, तर कारखानदारांनादेखील पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला. महागडी यंत्रे, माल, कागदपत्रांसह अनेक वस्तू वापरण्यायोग्य राहिल्या नाहीत. त्यामुळे रहिवासी व कारखानदार चिंताग्रस्त झाले आहेत. कपडे व्यापारीदेखील या संकटातून सुटले नाहीत.
पावसाचा कहर मोठा असल्याने संसाराला लागणाऱ्या वस्तू पाण्यात गेल्या. याकडे सरकारने लक्ष घालावे, भरपाई देत भविष्यात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत. वसई पश्चिम भागात नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. दरम्यान, रहिवासी घरांना भरपाई मिळणार आहे. परंतु व्यावसायिकांचादेखील सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद वाडेकर यांनी दिली.
आर्थिक खर्चाची चिंता
वसई-विरार महापालिकेने नालेसफाईचा दावा केला तरी शहरात पाणी साचून राहिले होते. कित्येक तास पाण्याचा निचरा होत नव्हता. शहराला पाण्याने वेढा घातला होता. त्यामुळे वाहनांनादेखील फटका बसला असून, वाहने बिघडली. त्यामुळे वाहनमालकांवर खर्चाचा भार आला. घरातील खराब झालेल्या वस्तू, कारखान्यांतील साहित्य पुन्हा खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे आर्थिक डोंगर आल्याने नागरिक चिंतेत सापडले आहेत.
कार्यालयात पावसाचे दीड फुटापर्यंत पाणी शिरले. कागदपत्रे भिजून नासधूस झाली. कार्यालयाच्या दुरुस्तीच्या खर्चाचा ताण येणार आहे. पहिल्यांदाच आनंदनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
- विजय सामंत, व्यावसायिक
वेल्डिंगसाठी लागणारी १० यंत्रे नादुरुस्त झाली आहेत. अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले असून, नवीन यंत्रे घेण्याचा खर्च उचलावा लागणार. त्यानंतर पुन्हा काम सुरू केल्यावर कामाचे पैसे मिळतील. सरकारने नुकसानभरपाई द्यावी.
- सुंदरम भास्कर, कारखानदार, वसई
आमच्या घरातील फर्निचर, कपडे खराब झाले. फ्रीज, दरवाजाचे नुकसान झाले. भिंती ओल्या झाल्या असून सुमारे ७९ ते ७५ हजारांचे नुकसान झाले आहे.
- सुराजसिंह नगरकर, रहिवासी
वसई मोठे शहर असल्याने कपड्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचल्याने साहित्याचे चांगलेच नुकसान झाले. अंदाजे तीन लाखांच्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. सरकारने आम्हाला व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत करावी.
- नारायण मखिजा, कापड व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.