निर्विघ्न गणेशोत्सवाचा निर्धार
नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये तसेच कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी सात पोलिस उपआयुक्त, १३ सहाय्यक पोलिस आयुक्त, ६४ पोलिस निरीक्षक, २३५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच २,२५० पोलिस अंमलदार तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स, क्यूआरटी, आरसीपी, एसआरपीएफ तसेच ३०० होमगार्ड तैनात ठेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळे, विसर्जन स्थळे, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षित बॉम्ब शोधक व नाशक पथकदेखील तैनात ठेवण्यात येणार आहे.
-------------------------------------------
समाजकंटकांवर विशेष लक्ष्य
समाजकंटकांवर व समाजविघातक व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील सर्व गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर पोलिस आणि महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
--------------------------
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पथक
उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियम २००० व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ संदर्भात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांत ध्वनिप्रदूषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदारांना ध्वनिमापक यंत्रे हाताळण्याबाबतचे प्रात्याक्षिक, प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-----------------------------------------
मंडळांसोबत बैठकांचे सत्र
गणशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ध्वनिप्रदूषण रोखणे तसेच उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणशोत्सव मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात येत आहेत.
-----------------------------------------
गणेशोत्सव निर्विघ्न साजरा व्हावा तसेच गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशभक्तांनीदेखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोर पालन करावे.
- योगेश गावडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.