मुंबई

‘गुंड्याभाऊ’ला अजरामर करणारा कलावंत!

CD

‘गुंड्याभाऊ’ला अजरामर करणारा कलावंत!

धनंजय कुलकर्णी

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस मुंबई दूरदर्शनवर सादर झालेली ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ही कृष्णधवल रंगातील मालिका त्या काळात प्रचंड गाजली होती. या मालिकेतील ‘गुंड्याभाऊ’ची भूमिका साकारणारे बाळ कर्वे यांनी काल जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली. बाळ कर्वे यांच्यासाठी ही भूमिका म्हणजे त्यांची आयुष्यभराची ‘ओळख’ ठरली. ते म्हणायचे, ‘‘मुंबईत कार्यालयात, विलेपार्ल्यात मला सर्व जण याच नावाने संबोधायचे. ही भूमिका माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली होती!’’ आजदेखील अनेक रसिकांना बाळ कर्वे यांचा गुंड्याभाऊ लख्ख आठवतो.

‘‘चिमण अरे चिमण, काय घोळ घालून ठेवला आहेस? आता हा घोळ मलाच निस्तरावा लागेल,’’ अशी अनुनासिक हाळी देत गुंड्याभाऊ अवतरायचे आणि मग चिमणराव आणि गुंड्याभाऊ यांची धमाल सुरू व्हायची. बाळ कर्वे यांचा या भूमिकेतील गेटअप जबरदस्त होता. डोक्यावर पगडी किंवा काळी टोपी, झुबकेदार मिशा, हातात सोटा आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव घेऊन ते भूमिका साकारायचे. खरंतर या मालिकेमध्ये त्यांचा समावेश शरद तळवलकर यांच्यामुळे झाला. कारण ही भूमिका आधी तेच साकारणार होते; पण चित्रपटात व्यग्र असल्यामुळे त्यांनीच बाळ कर्वे यांचे नाव सुचवले.  ही मालिका त्या काळात प्रचंड गाजली. याचे संवाद व. पु. काळे यांनी लिहिले होते. अभिनयातील साधेपणा, प्रभावी संवाद शैली आणि विलक्षण बोलका चेहरा हा बाळ कर्वे यांच्या अभिनयाचा ‘यूएसपी’ होता. आज इतकी वर्षे झाली तरी गुंड्याभाऊ म्हटलं की बाळ कर्वेच डोळ्यापुढे येतात.
या मालिकेनंतर ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ नावाचा चित्रपटदेखील आला. याचे संवाद विजय तेंडुलकर यांनी लिहिले होते, पण चित्रपटाला मालिकेइतके यश मिळाले नाही. बाळ कर्वे तसे चित्रपट-नाट्यक्षेत्रात खूप कमी वावरले. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी स्थापत्य अभियंता म्हणून नोकरी केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ते पदवीधर होते. मराठी चित्रपट ‘बन्या बापू’ आज खास आठवला जातो. यातील ‘ले लो भाई चिवडा ले लो’ आणि ‘प्रीतीचे झुळझुळ पाणी’ ही गाणी पाहताना मजा येते. चित्रपटात मात्र ते फारसे रमले नाहीत. ‘जैत रे जैत’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘सुंदरा सातारकर’, ‘चटक चांदणी,’ ‘लपंडाव’ हे त्यांचे काही निवडक चित्रपट.
मुंबईत आल्यानंतर ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेत त्यांनी काही नाट्यप्रयोग केले. स्वतः स्थापत्य अभियंते असल्यामुळे नाटकाचे सेट बनवण्याचे कामदेखील त्यांनी केले. विमानातून नाटकाचे सेट कसे नेता येतील यासाठी घडीचे सेट त्यांनी तयार केले होते. रंगायनच्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकाचे प्रयोग जर्मनीत झाले. त्या वेळेला हे सेट वापरले गेले. साहित्य संघाचे ‘संध्याछाया’ हे कर्वे यांचे पहिले व्यावसायिक नाटक. यात विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्यादेखील भूमिका होत्या. सूर्याची पिल्ले, रथचक्र, तांदूळ निवडता निवडता, कुसुम मनोहर लेले, मनोमनी, आई रिटायर होतेय, आम्ही लटिके न बोलू ही त्यांची गाजलेली नाटके. सई परांजपे यांच्या ‘कथा’ या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.
माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिराच्या दुरुस्ती आणि फेररचनेचे काम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होते. गजानन जागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेत त्यांनी ‘गंगोबा तात्या’ या खलनायकाची भूमिका केली होती. यातील त्यांच्या तोंडी असलेला ‘काsssय?’ हा शब्दप्रयोग आणि त्यांची उच्चारण्याची पद्धत खूप लोकप्रिय झाली होती. त्यांचा चेहरा आणि डोळे अतिशय संवेदनशील, बोलके होते. त्यामुळे अभिनयाचा सगळा भाव चेहऱ्यात उठून दिसायचा. टीव्हीवरील प्रपंच, वहिनीसाहेब, महाश्वेता, राधा ही बावरी, उंच माझा झोका या त्यांच्या मालिका लोकप्रिय ठरल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान; नांदेड, लातूर जिल्ह्यांत कहर; सात जिल्ह्यांतील १३० मंडलांना दणका

ED Notice : ‘ED’चे मोठे पाऊल!, इंटरपोलकडून पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी

Vani Accident : टॅक्टर ट्रॉलीस कारची धडक; १३ महिलांसह १४ जखमी

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

SCROLL FOR NEXT