आंदोलकांनी घेतला दक्षिण मुंबईचा ताबा
परिसराला छावणीचे स्वरूप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः आरक्षणाचा गुलाल डोक्यावर उधळल्याशिवाय मागे हटणार नाही, अशा निर्धाराने मनोज जरांगे-पाटील आणि त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, मुंबईचा चक्का जाम झाला आहे. खेडोपाड्यातील हजारो लोकांनी दक्षिण मुंबईतील रस्ते, गल्ल्या व्यापून टाकल्या आहेत. सर्वत्र मराठा बांधव दिसत आहेत. एखाद्या जत्रेला पंचक्रोशीतील लोक जमा व्हावेत, तसा आंदोलकांनी अख्ख्या दक्षिण मुंबईचा ताबा घेतला आहे.
राज्याच्या सर्व जिल्ह्यांतून, गावखेड्यांतून मराठा समाज आझाद मैदानाकडे लोटला आहे. यात तरुणांचा सहभाग मोठा आहे. महिला, लहान मुले यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही कमालीचा उत्साह आहे. ‘आम्हाला आमच्या भविष्याची नाही, तर पुढच्या पिढीच्या भविष्याची चिंता आहे. त्यांच्यासाठी आमचा लढा आहे. जरांगे-पाटील हे आम्हाला आरक्षण मिळवून देणारच,’ असा विश्वास मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
सकाळी न्याहारी करण्याची सवय असल्याने आंदोलक ठिकठिकाणी आपल्या बॅगांतून सोबत आणलेली भाकरी खाताना दिसत होते. सकाळपासून पाऊस असल्याने आंदोलक भिजत आहेत. आझाद मैदानात चिखल झाला असला तरी पावसाने जराही आंदोलकांचा हिरमोड झालेला नाही. दरम्यान, पावसाने गारठलेले आंदोलक जागा मिळेल तिथे आरसा घेत आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट स्थानक, मुंबई महापालिका मुख्यालय यासह फोर्टमधील सर्व इमारतींच्या पायथ्याशी आंदोलकांनी पावसामुळे आसरा शोधला. भगवा मफरल, जरांगे यांच्या फोटोचा बॅच घातलेले कार्यकर्ते सर्वत्र दिसत होते. त्यांच्यामुळे दक्षिण मुंबईला छावणीचे स्वरूप आले आहे.
...
फोर्ट परिसर बंद असल्याने परवड
फोर्ट परिसरातील दुकाने आज बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे आंदोलकांच्या खाण्यापिण्याची, चहापानासाठी मोठी अडचण झाली होती. उघडी दुकाने शोधण्यासाठी आंदोलकांना बरीच पायपीट करावी लागली. फोर्ट परिसर आंदोलकांनी गजबजला होता. सगळा ग्रामीण महाराष्ट्र आज फोर्ट भागात आणि दक्षिण मुंबईत लोटला होता.
...
पावसाने पोलिसांना केली मदत
जरांगे यांचे आझाद मैदानात दाखल झाले त्या वेळी मोठा जनसमुदाय त्यांच्यासोबत होता. त्यामुळे त्या जमावाला आवरणे पोलिसांच्या नाकी नऊ आले. उपोषण सुरू झाल्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यामुळे आझाद मैदान, पालिका मुख्यालय आणि सीएसटी स्थानकाबाहेर असलेली गर्दी पावसाने पांगवली. त्यामुळे पोलिसांना एक प्रकारची मदतच झाल्याचे दिसले.
...
लालबागच्या राजाचे आकर्षण
खेडोपाड्यांतून आलेल्या आंदोलकांना लालबागच्या राजाचे आकर्षण होते. त्यामुळे बऱ्याच आंदोलकांनी लालबाग गाठले. पावसात भिजत त्यांनी लालबागच्या गर्दीचा अनुभव घेतला. लालबाग, करी रोड, चिंचपोकळी परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक दिसत होते.
...
सबवेमध्ये वामकुक्षी
रात्रभर जागलेल्या आंदोलकांनी मोर्चा आझाद मैदानात पोहोचताच जल्लोष केला. त्यानंतर त्यांनी बाजूच्या सीएसटी स्थानकात आणि सीएसटी स्थानकाच्या सबवेमध्ये पथारी माडली. थकलेल्या आंदोलकांनी तेथे वामकुक्षी घेतली. सबवेमधील सर्व दुकाने आज बंद होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.