बेस्ट सेवा कोलमडली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे शुक्रवारी (ता. २९) सकाळपासून मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली. रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे आणि मोर्चाच्या मार्गक्रमणामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होती. याचा सर्वाधिक फटका बेस्ट बससेवेला बसला. तब्बल ४० हून अधिक मार्गांवरच्या सेवांमध्ये बदल करण्यात आला, तर काही ठिकाणी बस पूर्णपणे बंदच ठेवण्यात आल्या.
मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन मानली जाणारी बेस्ट सेवा मोर्च्यामुळे ठप्प झाल्याने सकाळी कामावर, शाळा–कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. आंदोलकांनी अनेक बस रस्त्यातच थांबविण्यात आल्याने प्रवाशांना उतरून पायी प्रवास करावा लागला. अनेक बस ३० ते ४५ मिनिटे उशिरा धावत होत्या. मोर्च्यामुळे शहीद भगतसिंग रोड, मानखुर्द–सायन-पनवेल महामार्ग, सीएसएमटी, डायमंड गार्डन, सायन-तुर्भे रोड, देवनार डेपो परिसर, महाराणा प्रताप चौक अशा महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक विस्कळित झाली. महापालिका रोड व महात्मा गांधी रोड बंद झाल्याने येथील बस महात्मा फुले बाजार व महर्षी कर्वे मार्गाने वळवण्यात आली. बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले, की प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार तत्काळ बसमार्ग बदल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाल्याने रस्ते मोकळे न झाल्याने बससेवा वेळेवर सुरू ठेवणे अशक्य झाले.
पूर्व उपनगराला फटका
दुपारी १ ते ४ या वेळेत चेंबूर नाका, व्ही. एन. पुरव मार्ग, अमर महाल, डायमंड गार्डन या ठिकाणीही मार्ग बदल करण्यात आले. परिणामी या भागातही बससेवा विस्कळित झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.