मराठा आंदोलनाला मुंबईकरांची सहानुभूती
शहराला वेठीस न धरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : आपल्या हक्काच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून मुंबईत केले जाणारे आंदोलन रास्तच आहे. आंदोलन करणे त्यांचा अधिकार आहे; पण आंदोलन करताना मुंबईकरांना किंवा अन्य घटकांना वेठीस धरू नका. तुमच्याप्रमाणेच तो आपल्या पोटासाठी, कुटुंबासाठी दिवसरात्र पायाला भिंगरी लावून धावतो. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलन करवे, सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडाव्यात; पण ते शांततेने व्हायला हवे, अशी भावना आज मुंबईकरांकडून व्यक्त केली. मराठा समाजाचे लाखो लोक आझाद मैदानात दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकर अडकून पडले आहेत; तरीही मुंबईकरांना मराठा बांधवांच्या मागण्यांबाबत आपुलकी वाटत असल्याचे दिसत आहे.
...
आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन रास्त आहे; पण त्यामुळे आज संपूर्ण मुंबई ठप्प पडली आहे. पोलिसांनी एक मार्गिका बंद केली आहे, तर आंदोलकांनी दुसरी मार्गिका ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आम्ही सकाळपासून अडकून पडलो आहोत. यात मुंबईकरांचा काय दोष आहे?
- ॲड. हरमितसिंग लुबामी, व्यावसायिक
...
मुंबईकर म्हणून गणेशोत्सवातील श्रद्धा, सौहार्द आणि परंपरा जपणे आपले कर्तव्य आहे. आंदोलन हा लोकशाहीतील हक्क आहे; मात्र तो शांततेतच प्रभावी ठरतो. आनंदमय उत्सवाला धक्का न लावता न्यायाच्या मार्गानेच समाजहित साधले पाहिजे.
- डॉ. वेदप्रकाश तिवारी, वकील
...
मराठा समाजाच्या मुलांचे होणारे नुकसान पाहता मराठा समाजाला आरक्षणाची आता खरोखर गरज आहे. जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला आला आहे. सरकारने आतापर्यंत अनेक वेळा आपल्या भूमिका बदलल्या आहेत. दुटप्पी भूमिका घेणाऱ्या सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येऊनही सरकार त्याची दखल घेत नसेल तर सरकार नक्की सर्वसामान्यांचे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- गंगाराम अहिनवे, रिक्षाचालक
...
काही महिने आधी तारीख सांगूनदेखील सरकारने काणाडोळा केल्याने आज ही वेळ आली आहे. त्या वेळीच जर आंदोलनाची वेळ बदलायला सांगितली असती तर गणेशोत्सवामध्ये हे आंदोलन झाले नसते. आता आले आहेत तर होऊ द्या आंदोलन. देशातून कित्येक जण इथे नशीब आजमावायच्या आशेने येतात, त्याचप्रमाणे मराठे आले आहेत. त्यामुळे सरकारने लवकर तोडगा काढावा.
- कल्पेश शेलार, मुंबई अध्यक्ष, मराठा उद्योजक लॉबी
...
- याआधी मराठा क्रांती मोर्चा या संघटनेने आरक्षणासाठी मुंबईत शांततेत मूक मोर्चा काढला होता. त्याचे कौतुक झाले होते. मात्र शुक्रवारच्या आंदोलनाने सर्वसामान्य नागरिक, नोकरदारवर्ग, व्यावसायिकांना मनस्ताप झाला. आंदोलक वाटेल तिथे रस्ता अडवत होते. त्यावरून शक्य तिथे अडवणूक करावी, या इराद्याने आंदोलक मुंबईत आल्याची जाणीव होत होती. विशेष म्हणजे आंदोलन आयोजित करणाऱ्या प्रमुखांचे आंदोलकांवर कोणतेही नियंत्रण नव्हते.
- ॲड. यतीन चिवलेकर
...
माझ्या मुलींना हैदराबाद येथे जाण्यासाठी सीएसएमटी येथून गाडी पकडायची होती; पण बातम्यांमध्ये सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर वाहतूक कोंडी असल्याचे समजल्याने लोकलने टर्मिनस गाठले. मात्र तेथे पोहोचल्यावर स्थानकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आंदोलकांचे घोळके बसलेले, झोपलेले होते. त्यातून मार्ग काढत फलाट क्रमांक नऊवर उभ्या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला. गाडी वेळेत सुटली. त्यामुळे आणखी थोडा विलंब झाला असता तर गाडी सुटू शकली असती.
- क्रांती म्हात्रे, गृहिणी
...
शहराने थोडी झळ सोसली पाहिजे. आंदोलने झाली पाहिजेत. आंदोलनामुळे थोडी असुविधा होत आहे, ती सहन केली पाहिजे. गावखेड्यांतून आलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे.
- तुषार गांधी, महात्मा गांधीजींचे पणतू
...
क्षणचित्रे
१. मंत्र्यांनी घेतला धसका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचा धसका मंत्र्यांनीही घेतला. मुंबईभर फिरणारे आंदोलक न जाणो मंत्र्यांच्या बंगल्यात शिरले तर या भीतीपोटी मंत्रालयासमोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांची कधीही बंद न होणारी फाटके आज बंद करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांची कार्यालयेसुद्धा येथील बंगल्यातच आहेत. या बंगल्यांमधील दिवेसुद्धा आज बंद ठेवण्यात आले होते.
...
२. मंत्रालयातील बाबूही घाबरले
नरिमन पॉइंट परिसरात आलेले आंदोलक मंत्रालयात येऊ नयेत, यासाठी आज मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मंत्रालय प्रवेशासाठी असलेली स्वयंचलित संगणकीय यंत्रणासुद्धा बंद ठेवण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.